आम आदमी पार्टी युवा आघाडीची मागणी; कारवाईसाठी पुढाकार नाही
पुणे : शहरासह जिल्ह्यात नायलॉन मांजा बंदीची कडक अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी आम आदमी पार्टी युवा आघाडीने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. घोषित केलेली बंदी कागदावरच राहिल्याने हा नायलॉन मांजा नागरिकांच्या जीवावर उठला आहे. त्यामुळे मांजा बंदीची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पशु-पक्ष्यांसह नागरिकांच्या जीवाला घातक ठरत असल्यामुळे काचेचे लेपण लावलेल्या नायलॉन, तंगुस अशा कृत्रिम दोर्यांपासून बनवलेल्या मांजा उत्पादन, साठा विक्री आणि खरेदीवर बंदी घातली आहे. तरीदेखील पतंगासाठी नायलॉन, गट्टू आणि तंगुस मांजा या सांकेतिक नावाने चीन आणि भारतीय बनावटीचा मांजाची सर्रासपणे विक्री केली जाते. पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणार्या चीनी बनावटीचा आणि नायलॉनचा मांजा नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. पक्ष्यांसह दुचाकीस्वार जखमी होत असून पुणे, पिंपरी-चिंचवडसह नागपूर येथे गळा चिरल्याने दोघांचा बळी गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. धारदार, घातक मांजावर बंदी असतानाही पोलिस, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महानगरपालिका यापैकी कुणीही कारवाईसाठी पुढाकार घेतलेला नाही. बंदी कागदावरच राहिल्याने मांजा जीवावर उठत आहे.
दरम्यान, मकरसंक्रांत जवळ आली आहे. या काळात मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर केला जातो. ही बाब लक्षात घेऊन नायलॉन मांजा बंदीची कडक अंमलबजावणी करावी, नायलॉन मांजाविक्रेत्यांवर मुख्यत: घाऊक विक्री दुकानांवर छापे टाकण्यात येऊन नायलॉन मांजा जप्त करण्याची कारवाई करण्यात यावी, याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.