नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करा : विशाल वाकडकर

0
पिंपरी चिंचवड : मकर संक्रांतीच्या काळात शहरभर अनेक ठिकाणी पतंग उडविले जातात. हे पतंग उडविण्यासाठी बंदी असलेला चिनी किंवा नायलॉनचा मांजा वापरला जातो. या मांज्यामुळे गळा कापून मागील वर्षी याच काळात डॉक्टर तरुणीचा नाशिक फाटा येते अपघात होऊन मृत्यू झाला होता. तसेच काळेवाडीत आणि पुण्यात काही तरुण व बालके चिनी मांजा कापल्यामुळे जखमी झाली होती. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शहरातील चायनिज व नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पर्यावरण संरक्षण कायदा 1986 नूसार कडक कारवाई करावी, अशी मागणी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केली आहेे. यासंदर्भात, पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.
कडक अंमलबजावणी आवश्यक…
संक्रांतीच्या काळात देशात ठिकठिकाणी पतंग उडविण्याच्या स्पर्धा, महोत्सव आयोजित केले जातात. उत्साही युवक व आबाल वृध्द देखील यात भाग घेताना दिसतात. परंतू अनेक ठिकाणी बंदी असणारा चायनिज मांजा व नायलॉनचा मांजा वापरला जातो. या मांजामुळे शेकडो पक्षी जखमी होऊन मृत पावतात. तसेच शहरी भागात दुचाकी चालकांचे व पादचार्‍यांचे अपघात होतात, त्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कडक अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.