नारायणगावातील मुक्ताबाई देवीच्या यात्रेला प्रारंभ

0

नारायणगाव । नारायणगावचे ग्रामदैवत मुक्ताबाई देवी व श्री काळोबा देवस्थानच्या यात्रेला गुरुवारपासून सुरुवात झाली. देवीच्या पादुकांची मंदिरापर्यंत सवाद्य मिरवणूक यात्रेला प्रारंभ झाला. यानिमित्त श्री. मुक्ताबाई देवस्थान ट्रस्टकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 19 एप्रिल दरम्यान हे कार्यक्रम चालणार आहेत. कुस्त्यांचा आखाडा, घागरी, शोभेचे दारुकाम, विविध प्रकारचे पाळणे, खवय्यांची लज्जत तसेच तमाशा पंढरी यात्रेचे मुख्य आकर्षण आहे. यात्राकाळात लोकनाट्य तमाशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ शेटे व यात्रा कमिटीचे अध्यक्ष सरपंच योगेश (बाबु) नामदेव पाटे यांनी दिली.

कै. तुकाराम खेडकर व पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेची मिरवणूक, रात्री 8 ते 10 हनुमान भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम, रात्री दहा वाजता चंद्रकांत ढवळपुरीकरसह किरणकुमार ढवळपुरीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम तर शुक्रवारी देवीचा उत्सव, मांडव डहाळे, नैवेद्य, घागरी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीमध्ये ढोलताशांचा आवाज घुमणार आहे. रात्री 11 वा. कै. तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी देवीस व काळोबा देवास मांडव डहाळे, चोळी पातळ व देवीस शेरणी नैवद्य, छत्रपती शाहु महाराज व महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक, मुक्ताबाई प्रासादिक भजनाचा कार्यक्रम, छबिना मिरवणूक, शोभेचे दारूकाम,रघुवीर खेडकर तमाशा मंडळ लोकनाट्याचा कार्यक्रम, रविवारी कुस्त्यांचा आखाडा, रात्री मालती ईनामदार यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होणार आहे.

16 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक, कैलास नारायणगावकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम तसेच 17 एप्रिलला मंगला बनसोडेसह नितीन बनसोडे यांचा, 18 ला भिका भिमा सांगवीकर तर 19 ला प्रकाश आहिरेकरसह निलेश आहिरेकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होणार आहे.