नारायणगाव मध्ये कठुआ, उन्नाव येथील घटनेविरोधात सर्वधर्मीय मुकमोर्चा

0

नारायणगाव । कठुआ आणि उन्नाव तसेच देशभरात होत असलेल्या बलात्कार व निर्घुण हत्या प्रकरणांचे पडसाद देशभरात उमटत आहेत. या घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी नारायणगाव येथील ख्वाजा गरिब नवाज कमिटीच्या संयोजनाने गावातील नागरिकांनी एकत्र येत महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध म्हणुन शुक्रवारी (दि.20) दुपारी जुम्मा नमाज नंतर मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

लहान निष्पाप बालिका आणि महिलांना न्याय मिळावा व आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी, याकरिता सुन्नी जामे मस्जिद, शिवाजी चौक ते बाजारपेठ मार्गे नारायणगाव बस स्थानक येथे जुबेर आतार, दानिश इनामदार, मोहसिन शेख, तौसिफ पठाण, रियाज मनियार, महेबुब काझी सर, युवा शक्ती फाउंडेशन, महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष अशफाक पटेल यांच्या संयोजनाखाली मोर्चाचे आयोेजन करण्यात आले होते. यावेळी तहुरा सिकंदर इनामदार, सद्दाम सिकंदर इनामदार, तनाज शकिल मनियार, इकरा इजाज आतार या लहान मुलींच्या हस्ते नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अजय गोरड नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

महिलांसह मुलांचा मोर्चात सहभाग
यावेळी नारायणगाव परिसरातील हिंदु मुस्लिम बांधव महिला, पुरुष, लहान मुले व मुलींनी आपल्या भगिनींच्या न्यायासाठी मोर्चात सहभागी होत तिरंगा फडकवत, ना जातीसाठी ना धर्मासाठी हा मोर्चा भारताच्या लेकीसाठी, आसिफा हम शर्मिंदा है, तेरे कातील जिंदा है, जस्टिस फॉर आसिफा अँण्ड उन्नाव, ये बेटी की नही मानवता की हत्या है असे विविध पोस्टर्स झळकवत मोठ्या संख्येने निषेध नोंदवला. तसेच हा मोर्चा चांगल्या पद्धतीने पार पडावा यासाठी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने योग्य सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी मोर्चा शांततेत पार पाडल्याबद्दल नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अजय गोरड यांनी सर्वांचे आभार मानले.

फाशीच्या शिक्षेची केली मागणी
यावेळी तहुरा इनामदार, सद्दाम इनामदार, तनाज मनियार, इकरा आतार, निषेध व्यक्त करताना म्हणाले की, पर स्त्री ही मातेसमान आहे ही शिवाजी महाराजांची शिकवण आपण विसरत चाललो आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा या हेतुने राज्यघटना तयार केली परंतु आज संविधानाला नाकारुन दुष्प्रवृत्ती बळावत चालली आहे. कायद्याचे रक्षकच कायद्याचे भक्षक बनले आहेत. अशा शब्दात निषेध व्यक्त करत आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली. मोर्चात राजश्री बोरकर, पुष्पा खैरे, मकरंद पाटे, गणेश वाजगे, साईनाथ ढमढेरे, निशिगंध पाटे, अली इनामदार, सिद्दिक शेख, गफुर तांबोळी यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.