पू.नारायणदादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्काराने काळम पाटील सन्मानित

0

नारायणदादा काळदाते यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले – कुलगुरू डॉ.ढवण

अंबाजोगाई : ग्रामिण भागाच्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्वपुर्व कार्य नारायणदादा काळदाते यांनी केले. पू.नारायणदादांच्या विचारांचा हा वारसा त्यांच्या नांवे कार्य करीत असलेल्या प्रतिष्ठाणने चालविला आहे. प्रतिष्ठाणचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत येणाऱ्या काळात कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रमांची आवश्यकता असून पुढील काळात कृषी क्षेत्रात नवे तंत्रज्ञान येणार आहे.त्यामुळे कृषी उद्योजक निर्माण झाले पाहिजे, शेतकर्‍यांना आर्थिक स्थैर्य मिळाले पाहिजे अशी अपेक्षा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ए.एस.ढवन यांनी व्यक्त केली.ते पू.नारायणदादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्कार वितरण प्रसंगी बोलत हेाते.यावर्षी हा पुरस्कार गेवराईचे शिक्षण विस्तार अधिकारी प्रविणकुमार श्रीराम काळम पाटील यांना प्रदान करण्यात आला.

अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आण्णासाहेब खंदारे तर विचारपिठावर सत्कारमुर्ती प्रविणकुमार काळम पाटील, सौ.सुलभाताई काळम पाटील,नॅचरल शुगरचे चेअरमन बी.बी.ठोंबरे, बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा,माजी कुलगुरू मधुकरराव गायकवाड, प्राचार्य डॉ.बी.आय. खडकभावी,डॉ.सुरेश खुरसाळे,प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, प्रा.एस.के.जोगदंड यांच्यासह आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रविणकुमार काळमपाटील यांनी पुरस्काराचा हा क्षण जीवनाला वेगळी कलाटणी देणारा असून या पुरस्काराची तुलना कुठल्या ही अन्य पुरस्काराशी होवू शकत नाही.कारण,हा पुरस्कार मातीच्या माणसाचा सुगंध लागलेला आहे. माणसात देव शोधणार्‍या देव माणसाच्या नावाचा हा पुरस्कार असल्याचे सांगुन त्यांनी आपण करीत असलेले कार्य हे टिमवर्क आहे.हा पुरस्कार माझ्या सहकार्यांचा आहे. पुरस्काराची मिळालेली रक्कम जिल्हा परीषद शाळेच्या विज्ञान प्रयोग कक्षासाठी देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.विस्तार अधिकारी म्हणून कार्य करताना सर्वांना सोबत घेवून माणसे जोडली. शिक्षकांचे मनोबल वाढविले,सक्षमीकरण केले,त्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले,ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी, पुढील काळात कार्य करण्यासाठी ऊर्जा देणारा हा पुरस्कार असल्याचे काळम पाटील यांनी नमुद केले.

यावेळी बोलताना कुलगुरू डॉ.ए.एस.ढवण यांनी पुरस्कारासाठी अतिशय चांगल्या व्यक्तीची निवड केल्याचे सांगुन प्रतिष्ठाण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला मदत रूपाने भरीव सहकार्य करत असल्याचे नमुद केले. अमेरिकेच्या प्रगतीत भारतीय युवकांच्या बद्धीमत्तेचा मोठा वाटा असल्याचे सांगुन अंतराळ क्षेत्रात भारताने स्वतःचे तंत्रज्ञान निर्माण केल्यामुळे देश कृषी क्षेत्रात,संशोधनात वेगाने प्रगती करत असल्याचे ढवण म्हणाले.

प्रारंभी दिपप्रज्वलन व प्रतिमा पुजन करण्यात आले. प्रतिष्ठाणच्या वतीने मान्यवरांचे स्वागत झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी कुलगुरू मधुकरराव गायकवाड यांनी केले. प्रतिष्ठाणची भूमिका, कार्य पुरस्काराचे स्वरूप व उद्देश याची माहिती सभागृहासमोर ठेवली. पाहुण्यांचा परिचय कल्याण आपेट व संदिप पवार यांनी करून दिला.मानपत्राचे वाचन आदिनाथ धायगुडे यांनी केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते पू.नारायणदादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्कार प्रविणकुमार श्रीराम काळम पाटील यांना प्रदान करण्यात आला.पुरस्काराचे स्वरूप 21 हजार रुपयांचा धनादेश,फेटा, स्मृतीचिन्ह,सन्मानपत्र, पुष्पगुच्छ,शाल असे आहे.

यावेळी डॉ.नरेंद्र काळे यांनी उच्च शिक्षण सहाय्यता निधीची माहिती देवून सांगितले की,हे प्रतिष्ठाण पू.दादांच्या नांवे कार्य करीत असून दादांचे विचार,स्मरण व आठवण कायम रहावी या भूमिकेतुन कार्य करीत आहे.दरवर्षी विविध मान्यवरांना बोलावुन त्यांचे विचार ऐकुन त्यांच्या हस्ते सत्कार मुर्तींचे सत्कार घडवून प्रतिष्ठाणने समाजाभिमुख कार्याचा वसा घेतल्याची माहिती डॉ.काळे यांनी दिली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व दानशूर व्यक्तींच्या हस्ते या निधीचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी सभापती राजेसाहेब देशमुख, प्राचार्य डॉ.महादेव गव्हाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर अध्यक्षीय समारोप आण्णासाहेब खंदारे यांनी केला. पू.नारायणदादांच्या स्मृतिदिनी नेत्रदानाचा संकल्प करणार्‍या डॉ.सुमेधा ज्ञानोबा लाड यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्योती शिंदे यांनी करून उपस्थितांचे आभार अंगदराव तट यांनी मानले. कार्यक्रमासाठी सभागृहात सर्वच क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्याने उपस्थित होते.