नालासोपार्‍यात सेक्ससाठी नकार दिल्याने मुलीची हत्या

0

मुंबई । फेसबुकवरून झालेली मैत्री जीवावर बेतल्याचा प्रकार रविवारी नालासोपारा येथे घडला. वाशीला राहणारी एक 20 वर्षीय युवती एका 25 वर्षीय मित्राला भेटायला गेली. तिचा मृतदेह सायंकाळी युवकाच्या इमारतीत जिन्यावर आढळला. अंकिता मोरे असे मृत युवतीचे नाव आहे, तर हरिदास निरगुडे असे आरोपीचे नाव आहे. हरिदास निरगुडे याच्याशी अंकिताची अलीकडेच फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती. या मैत्रीतून ती निरगुडेला भेटायला गेली. ’शारीरिक संबंधांसाठी तिने नकार दिल्याने तिला ठार केले,’ अशी कबुली निरगुडेने तुळींज पोलिसांना दिली आहे.

नालासोपारा पूर्वेतील अलकापुरी भागात असलेल्या तानिया मोनार्क या इमारतीच्या तळमजल्यावर अंकिता रविवारी संध्याकाळी बेशुद्धावस्थेत आढळली. तिला पाहणार्‍या रहिवाशाने ताबडतोब पोलिसांना कळवले. पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे निदान करण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला. तपासात त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. या इमारतीत राहणार्‍या कोणालाही या तरुणीबद्दल काहीही माहीत नव्हते. इमारतीत सीसीटीव्ही नसल्यामुळे नेमके काय घडले असावे, याचा अंदाज येत नव्हता. रहिवाशांपैकी एकाने तिला निरगुडेच्या घरात जाताना पाहिले होते. त्यामुळे पोलिसांनी निरगुडेच्या घराची झडती घेतली. त्यावेळी अंकिताची पर्स आणि मोबाइल त्याच्या घरात आढळले. तसेच त्याच्या बेडरूममध्ये रक्ताचे डाग आढळल्यामुळे निरगुडेकडे चौकशी केली. चौकशीत आपणच अंकिताची बुटाच्या दोरीने गळा आवळून हत्या केल्याचे त्याने कबूल केले. मेसेजच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. रविवारी अंकिता घरी कोणालाही न सांगता निरगुडेला भेटायला नालासोपार्‍याला आली. निरगुडे बहिणीसोबत या फ्लॅटमध्ये राहतो. बहीण घरात नव्हती. त्याने तिला घरी बोलावले. शारीरिक संबंधांसाठी बळजबरी केली. तिने नकार दिला, तेव्हा तिचा गळा आवळला.