शेतकर्यांच्या सतर्कतेने आई-वडील बचावले ; प्रशासनाकडून युद्ध पातळीवर शोध मोहिम
भुसावळ- बोदवड तालुक्यातील साळशिंगी-उजनी दरम्यान असलेल्या नाल्याला गुरुवारी पूर आल्याने या पुराच्या पाण्यात शेतातून घराकडे जाणार्या शेतकर्याची बैलगाडी उलटल्याने 13 वर्षीय अल्पवयीन तरुणी बेपत्ता झाल्याची घटना गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने साळशिंंगी ग्रामस्थांनी नाल्याकाठी धाव घेतली असून शोधकार्याला वेग दिला आहे मात्र सायंकाळपर्यंत तरुणीचा शोध लागला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
पाण्याचा अंदाज न आल्याने बैलगाडे उलटले
गुरुवारी बोदवड तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने साळशिंगी-उजनी गावादरम्याच्या नाल्याला मोठ्या प्रमाणावर पूर आला तर याचवेळी साळशिंगी येथील शेतकरी सोपान चौधरी हे पत्नी व 13 वर्षीय मुलगी विद्यासह बैलगाडीद्वारे गावाकडे निघाले होते तर पाठीमागे अन्य शेतकर्यांचेदेखील बैलगाडे होते. नाल्याला पूर आल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने चौधरी यांची बैलगाडी पाण्यात उलटली मात्र याचवेळी अन्य शेतकर्यांनी सतर्कता दाखवत सोपान चौधरी व त्यांच्या पत्नीला ओढल्याने दाम्पत्य बचावले मात्र या दाम्पत्याची कन्या विद्या पाण्यात वाहून गेली. या घटनेची वार्ता कळताच बोदवडचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात, बोदवडचे उपनिरीक्षक जाने यांच्यासह प्रशासनाच्या अधिकार्यांनी धाव घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते मात्र तरुणीचा शोध लागू शकला नाही.