पिंपरी-चिंचवड : विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना अधिक प्रामाणिक असावे, भरपूर परिश्रम घ्यावेत. यातूनच आपल्याला यश प्राप्त होईल. तसेच नाविन्यपूर्ण संकल्पनेतून संशोधनात्मक प्रवृत्ती जोपासावी. जेणेकरून प्रगतीची झेप अधिक मोठी होईल, असे प्रतिपादन शासकीय तंत्रनिकेतनच्या संगणक विभागाचे प्रमुख यु. व्ही. कोकाटे यांनी व्यक्त केले. रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र येथे एकाच वेळी सुमारे 100 कॉपीराईटची नोंदणी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कोकाटे बोलत होते. यावेळी तंत्रशिक्षण विभागाचे सहाय्यक संचालक आर. पी. गायकवाड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उप कुलसचिव प्रमोद भडकवडे, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, पीसीईटीचे ट्रेनिंग प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे, संयोजिका प्रा. अर्चना चौगुले आदी उपस्थित होते.
संशोनाची नोंदही करा
कोकाटे म्हणाले, महाविद्यालयाने नाविन्यपुर्ण संशोधन, कल्पना यांची मांडणी केल्यानंतर त्यांची नोंद करणे आवश्यक आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या बदलांचा विचार करता पुढील काळात अधिकाधिक संशोधक, तंत्रज्ञ, उत्कृष्ट शिक्षक, चांगल्या शैक्षणिक संस्थांची गरज भासणार आहे. युवा पिढीकडे नाविन्यपूर्ण संकल्पनांचा भरपूर साठा आहे. त्यांनी आपल्या संकल्पनांवर काम करुन त्या समाजापुढे आणण्याची आवश्यकता आहे. या माध्यमातूनच आपला देश अधिक प्रगती करु शकेल. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना अधिक प्रामाणिक असावे, भरपूर परिश्रम घ्यावे यातूनच आपल्याला यश प्राप्त होते.
कॉपीराईट कायद्याचा लाभ घ्या
भडकवडे म्हणाले की, या उपक्रमाचे अन्य शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांनी अनुकरण करावे. महाविद्यालयातून साधारणपणे अभ्यासक्रमानुसारच कार्यक्रम घेतले जातात. पीसीसीओईआरने कॉपीराईट या उपक्रमाव्दारे वेगळा अनुभव विद्यार्थ्यांसमोर आणला आहे. आपले संशोधन आणि केलेले कार्य याचे पेटंट घेणे आवश्यक आहे आणि म्हणून त्याची कॉपीराईट कायद्यानुसार नोंदणी होणे गरजेचे आहे.
इंडिया रेकॉर्डस बुकची दखल
असा उपक्रम राष्ट्रीय पातळीवर नव्हे तर जागतिक पातळीवर प्रथमच होत असून याची नोंद बूक ऑफ इंडिया रेकॉर्डसने घेतली असल्याच प्राचार्य तिवारी यांनी सांगितले. सुत्रसंचालन प्रा. मानसी कुरकुरे यांनी केले. आभार डॉ. अर्चना चौगुले यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध विभागाचे प्रमुख, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.