नाशिकचे शेतकरी राजेंद्र जाधव यांच्या कामाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदींनी नाशिकमधील संशोधक तथा शेतकरी राजेंद्र जाधव यांच्या संशोधक कार्याचा गौरवास्पद उल्लेख केला. बागलाण येथील राजेंद्र जाधव यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने सॅनिटायझेशन मशीनची निर्मिती केली आहे. आपल्या गावाला कोरोनापासून वाचवण्यासाठी त्यांनी स्वत:च्या खर्चातून सॅनिटायझेशन मशीन तयार आहे.

राजेंद्र जाधव यांनी केलेल्या या प्रयोगामुळे कोरोना संकटात निर्जंतुकीकरण मोहिमेला मोठा वेग आला आहे. भविष्यकाळात या यंत्रामुळे प्रशासनाला व आरोग्य यंत्रणेला खूप मोठा आधार मिळणार आहे. त्यांनी बनवलेल्या या यंत्रांचे नाव त्यांनी ‘यशवंत’ ठेवले आहे.
नाशिक जिल्ह्यातील बागलाणमधील शेतकरी राजेंद्र जाधव यांनी गावात करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून छोट्या टँकरने सॅनिटायझर फवारणी सुरू केली. त्यांच्या या कामाची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी मेक इन इंडिया अंतर्गत संशोधित सॅनिटायझर मशीनमुळे कोरोना उच्चाटनाच्या युद्धात मोठे बळ मिळाले आहे. रस्ते, वसाहती, लिफ्ट, घरांचे दरवाजे, कंपाऊंड गेट, भिंती आदींना माणसांचा स्पर्श झाल्याशिवाय राहत नाही. कोणत्याही मार्गाने स्पर्श होणार्‍या विविध जागांवर निर्जंतुकीकरण करून संसर्ग टाळणे शक्य आहे. संशोधक राजेंद्र जाधव यांनी त्यांच्या शेतातील पिकांवर फवारणीसाठी यंत्र निर्मित केले होते. त्या यंत्राची उपयुक्तता तपासून कोरोना संकट काळात त्यांनी हे यंत्र सटाणा नगरपरिषदेला वापरासाठी दिले. त्याची दखल घेत खुद्द पंतप्रधानांनी या कामाचे कौतुक केले आहे.