भुसावळ। शहरातील गार्ड लाईन चर्च भागात माकडास अंमली पदार्थ पाजून त्याच्याकडून कु्रर खेळ सुरू असल्याची माहिती वन्यजीव मित्रांना कळताच त्यांनी वनविभागाला कळवल्याने तीन महिने वयाच्या माकडाची सुटका झाली तर नाशिकच्या मदारी असलेल्या पती-पत्नीस वनविभागाने कारवाईसाठी ताब्यात घेतल्याची घटना शनिवारी सकाळी 11 वाजता शहरात घडली.
तंबी देऊन दाम्पत्याची सुटका
प्राणी मित्र स्कायलॅप डिसुजा, अॅलेक्स प्रेस्डी, आबीद अली शेख यांना माकडाचा सिगरेट व गांजा पाजून छळ सुरू असल्याची माहिती कळताच त्यांनी या भागात धाव घेत वनविभागाला सूचित केले. कुर्हे वनपाल बी.एन.पवार, वनरक्षक व्ही.एच.कोळी, सुप्रिया देवरे, राजेश शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत माकडाची सुटका केली तर नाशिकच्या मोहगाव भागातील रवींद्र विठ्ठल तिळे व त्यांची पत्नी सुवर्णा रवींद्र तिळे यांना ताब्यात घेत यावल रोडवरील वनविभागाच्या तपासणी नाक्यावर आणले. उभयंतांवर वन्यजीव कायद्यांतर्गत कारवाई करून लेखी नोटीस देऊन त्यांची सुटका करण्यात आली तर ताब्यात घेतलेल्या माकाडाला वनविभागात सोडण्यात येणार असल्याची माहिती
सूत्रांनी दिली.
वन्यजीव कायद्यांतर्गत प्राणीमात्रांचा छळ करणे हा गुन्हाच असून या प्रकारांना आळा बसणे गरजेचे आहे. असा खेळ कुठे सुरू असल्यास वनविभागासह प्राणीमित्रांना सूचित करावे.
सतीश कांबळे, उपाध्यक्ष, वन्यजीव संरक्षण संस्था