नाशिकफाटा उड्डाणपुलाचा रॅम्प वाहतुकीसाठी खुला

0

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने प्रभाग क्रमांक 20 मधील भारतरत्न जे. आर. डी. टाटा उड्डाणपुलाच्या पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर, वाकड व हिंजवडीकडून पिंपरी, चिंचवड आणि मुंबईकडे जाणार्‍या रॅम्पचे उद्घाटन भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. प्रभाग क्रमांक 26 मधील औंध रावेत बीआरटीएस रस्त्यावर वाय जंक्शन पिंपळे निलख येथे बांधण्यात आलेल्या अंडरपासचे देखील उद्घाटन करण्यात आले.

महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसदस्य शत्रुघ्न काटे, मयूर कलाटे, नगरसदस्या सुनीता तापकीर, सुलक्षणा धर, आरती चौंधे, निर्मला कुटे, स्वीकृत सदस्य माऊली थोरात, माजी नगरसदस्य विजय लांडे, क्षेत्रीय अधिकारी आशा राऊत, सह शहर अभियंता राजन पाटील, प्रवीण तुपे, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवने, ज्ञानेश्‍वर झुंदारे, उप अभियंता विजय भोजने, संदेश खडतरे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे आदी उपस्थित होते.

नाशिक फाटा येथे हिंजवडी ते मोशी रस्ता छेदत असून सुरळीत वाहतूक व सिग्नल विरहीत वाहतूक होण्याच्या दृष्टीने नाशिक फाटा चौकामध्ये उड्डाणपुलाचे नियोजन करण्यात आले आहे. या रॅम्पमुळे पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड व हिंजवडी या भागाकडून येणार्‍या वाहनांना पिंपरी, चिंचवड, निगडी व मुंबईकडे जाणे सोईस्कर होणार आहे. तसेच नाशिकफाटा चौक सिग्नल विरहित करणे शक्य होणार असून नागरिकांना वेळेत पोहचण्यासाठी मदत होणार आहे. औंध रावेत बीआरटीएस रस्त्यावर वाय जंक्शन येथे बांधण्यात आलेल्या अंडरपासमध्ये ग्रेड सेपरेटरची एकूण लांबी 490 मीटर इतकी असून रुंदी 7.5 मीटर व उंची 5.5 मीटर इतकी आहे. यामुळे जंक्शन फ्री होणार असून बीआरटीएस बस सेवा जलद होणार आहे. तसेच वाकडहून पुण्याकडे जाणार्‍या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार आहे.