नाशिकला अवकाळी पावसाचा तडाखा

0

नाशिक : सटाणा तालुक्यातील अनेक गावात रविवारी दुपारी जोरदार अवकाळी पाऊस पडला. काही भागात गारपीटही झाली. अंबासन, आसखेडा गावात गारपीट झाली. अचानक आलेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीने डाळिंब, कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. सटाणा तालुक्यातील नामपूर परिसराला रविवारी दुपारी 1 च्या सुमारास गारपीट, वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने झोडपले. या अवकाळी पावसाचा शेतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या पावसाचा तडाखा इतका जबरदस्त होता की, काही क्षणातच अक्षरश: गारांचा खच रस्त्यावर पडला होता. शनिवारी सांगली आणि वाशिम जिल्ह्यातही अवकाळी पाऊस पडला होता.

कांदे व द्राक्षाचे नुकसान
लासलगाव व परिसरात दुपारी वादळ व मेघगर्जनेसह आलेल्या पावसाने शेतकर्‍यांनी शेतात काढुन ठेवलेले कांदे व द्राक्ष पिकांचे नुकसान झाले. रविवारी दुपारी 4 वाजता अचानक काळे ढग दाटून आले व त्यानंतर ढगांच्या गडगडाटासह तासभर पाऊस कोसळला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सध्या अनेक शेतकर्‍यांनी शेतात पोतीखाली कांदे झाकून ठेवले आहेत. अवकाळी पावसामुळे या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. द्राक्ष आता शेवटच्या टप्प्यात असुन या पिकालाही फटका बसला असल्याची शक्यता आहे.

शेतकर्‍यांची धावपळ
लासलगाव शहरात रविवारी आठवडे बाजार असतो. दुपारी अचानक आलेल्या पावसाने बाजारकरु व शेतकर्‍यांना धावपळ करावी लागली. उशीरापर्यंत चालणारा आठवडे बाजार पावसामुळे गावकर्‍यांना लवकरच आटोपता घ्यावा लागला.

येत्या 24 तासात कोकणात पावसाची शक्यता
येत्या 24 तासांत दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील काही भागात गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शनिवारी सांगली आणि वाशिम जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडला होता. तर रविवारी नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा बसला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली होती. राज्यातील सर्वच जिल्ह्यात उन्हाचे चटके बसत आहेत. अगदी महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणीही तापमानाने तिशी पार केली. रायगडमधील भीरामध्ये सर्वोच्च तापमानाची नोंद झाली.