भुसावळ/अहमदनगर : महागड्या लोखंडी सळईंची वाहतूक करताना महामार्गावर चालकांकडून त्यांची कमी भावात विक्री करण्याचा गोरखधंदा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होता. या बाबत नाशिक आयजींच्या विशेष पथकाला सुगावा लागताच अहमदनगरजवळ दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तीन ट्रेलरसह तब्बल दोन कोटी रुपयांच्या लोखंडी सळई जप्त करण्यात आल्या तर टोळीतील तब्बल 13 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आयजींच्या पथकाला टोळीचा सुगावा लागला मात्र स्थानिक पोलिस प्रशासन अनभिज्ञ कसे? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.
पहिल्या कारवाईत पाच आरोपी जाळ्यात
एमआयडीसी पोलिस स्टेशन, अहमदनगर हद्दीत औरगाबाद ते नगर हायवेवरील खोसपुरी शिवारात निलकमल हॉटेल/संग्राम हॉटेलच्या बाजूला ट्रेलरमधून पत्र्याच्या कम्पाऊंडमध्ये आसारी उतरवली जात असल्याची माहिती पथकाला मिळाल्यानंतर रविवारी पथकाने छापा टाकत पाच आरोपींच्या मुसक्या बांधल्या. आरोपींच्या ताब्यातून ट्रेलर (एन.एल.01 के.7022) जप्त करण्यात आला तसेच 37 लाख 73 हजार 116 रुपयांची लोखंडी सळई जप्त करण्यात आली. दरम्यान, मूळ मालकाने स्टील सळईंची ऑर्डर नोंदवल्यानंतर त्यातील काही क्विंटल सळई कमी भावात टोळीला विक्री केली जात असे व त्या मोबदल्यात चालकांना पैसे दिले होते. पांढरीपूल परीसरातील टोळीचा मुख्य सूत्रधार रामभाऊ (रा.पातोदा, ता.जि.बीड., हल्ली मु.अहमदनगर) हा पसार झाला आहे तर कामगार राजेश्वर सिंगानिया (43), राहुलकुमार कोईलराव (29), राजाराव रामफेर (34, तिघेरी मूळ रा.अयोध्या, ह.मु.पांढरीपूल, अहमदनगर), ट्रेलर चालक प्रमोद छबू बांगर (22), संदीप मोहन सांगळे (27, दोघेही रा.पाटोदा, बीड) या आरोपींना अटक करण्यात आली.
दुसर्या कारवाईत आठ आरोपी जाळ्यात
दुसर्या कारवाईत खोसपुरी शिवारात करण्यात आली. आठ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या तर दोन ट्रेलर (एम.एच.12 एस.एक्स.9899 व एम.एच.21 बीएच 4864) व लोखंडी सळईसह एक कोटी 48 लाख 62 हजार 45 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मुख्य मालक आदिनाथ रावसाहेब आव्हाड (26, पांगरमल, नगर), ऋषीकेश रामकिसन वाघ (22, वाघवाडी, नेवासा), चेतन राजेंद्र हरपुडे (22), शिवाजी नामदेव कुर्हाडे (30), गोरखनाथ आसाराम सावंत (30, सर्व रा.शिंगवेतुकाई, नेवासा), टे्रलर चालक तात्याराव अशोक सपरे, परशुराम अशाक सपरे (दोघे रा.महाकाल, ता.अंबड, जि.जालना), शैलेश ज्ञानोबा तांदळे (24, हिंगणी, बीड) या आठ जणांना अटक करण्यात आली.
यांच्या पथकाने आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई नाशिक आयजींचे डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलिस निरीक्षक बापू रोहम, सहाय्यक निरीक्षक सचिन जाधव, एएसआय बशीर तडवी, हवालदार रामचंद्र बोरसे, हवालदार शेख शकिल, नाईक मनोज दुसाणे, नाईक कुणाल मराठे, नाईक प्रमोद मंडलिक, नाईक सुरेश टोंगरे आदींच्या पथकाने केली.