नाशिक फाटा ते राजगुरूनगर रस्त्याचे काम होणार कधी?

0

सार्वजनिक बांधकाम, आयआरबीच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष : रस्त्याची दुरवस्था; अपघाताचे प्रमाण वाढले

चिंबळी । पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिकफाटा ते राजगुरूनगर रस्त्याचे काम कधी होणार आणि या महामार्गावर आणि किती अपघात होऊन बळी जाणार, असा प्रश्‍न येथील नागरीक करीत आहेत. या अपघातात काही जणांना गंभीर दुखापत होऊन कायमचे अपंगत्व आले आहे. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर फक्त घोषणा करीत असून प्रत्यक्ष कामाला केव्हा सुरुवात करणार, असा सवाल या मार्गावरील प्रवासी व ग्रामस्थ तसेच अपघातग्रस्त कुटुंबातील नातेवाइकांच्या वतीने करण्यात येत आहे.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चिंबळी फाटा-कुरुळी परिसरातील विविध गावांच्या फाट्यावर वाहतूक कोंडी होऊन महामार्ग थबकतो आहे. या परिसरातील ग्रामस्थांनी अनेक वेळा सिग्नलची आणि स्पीड ब्रेकरची मागणी करून देखील दखल घेतली जात नसून महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी साईट पट्ट्या आणि दिशादर्शक फलक, झेब्रा क्रॉसिंग, लाईट कटर, तसेच सिग्नल यंत्रणा या कामांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि आयआरबीचा अधिकारी वर्ग कानाडोळा करीत असल्याचे प्रवासी आणि स्थानिकांचे म्हणणे आहे.

रस्ता झाला धोकादायक
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर राजगुरुनगर ते चिंबळीफाटा रस्त्याची दुरवस्था झाली असून हा मार्ग धोकादायक झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईटपट्ट्या खचल्याने अनेकांचे जीव जाऊन काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. या मार्गावरील रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बुजवण्याची गरज असून, येथून होणारी जड वाहनांची वाहतूक आणि अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे चिंबळी फाटा ते आळंदीफाटा रस्त्या दरम्यान अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कुरूळी ग्रामपंचायतीच्या वतीने या महामार्गावरील विविध समस्यांच्या संदर्भात मागण्याचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आणि आयआरबी कपंन्यांना देण्यात आले आहे.

खड्डे बुजविण्याची मागणी
या महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्यात यावे आणि दोन्ही बाजूच्या साईटपट्ट्यांची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी, तसेच चिंबळी फाटा व कुरूळी फाटा येथे सिग्नल बसविण्यात यावा, अशी मागणी खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे, संचालक पाडूरंग बनकर, कुरुळीचे सरपंच चंद्रकांत बधाले, मोई गावच्या सरपंच अनुराधा गवारे, सारिका गवारे, पंचायत समिती सदस्य अमर कांबळे, उपसंरपच अमित मुहे, अनराग जैद आदी मान्यवरांसह ग्रामस्थ आणि प्रवाशांनी केली आहे.