‘नासा’तर्फे राजा चारी अवकाशात जाण्यासाठी सज्ज

0

लॉस एंजल्स। अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘नासा’तर्फे मूळचे भारतीय असणार्‍या राजा चारी यांची अंतराळवीर म्हणून निवड करण्यात आली आहे. यामुळे कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स नंतर ‘नासा’तर्फे अंतराळ मोहिमेवर जाणारे तिसरे तर एकंदरीत पाचवे भारतीय ठरतील. अमेरिकन नौसेनेत लेप्टनंट कर्नल म्हणून कार्यरत असणार्‍या 39 वर्षीय राजा चारी यांनी अलीकडेच यासाठी निवड झाली असून ऑगस्ट महिन्यापासून त्यांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे.

उज्ज्वल कारकिर्द :  राजा चारी हे मूळचे आंध्र प्रदेशातील होत. त्यांचे वडील श्रीनिवास चारी हे 1970 साली अमेरिकेतील आयोवातल्या सीडर फॉल्स येथे स्थायिक झाले होते. राजा चारी यांनी 1999 साली त्यांनी कोलॅरॅडो येथील अमेरिकन वायूदलाच्या महाविद्यालयातून अ‍ॅस्ट्रॉनॉटीकल इंजिनिअरींगमधील पदवी संपादन केली. यानंतर विश्‍वविख्यात ‘एमआयटी’ संस्थेतून स्नातकोत्तर पदवी मिळवून ते नौदलात पायलट म्हणून रूजू झाले. एफ-35, एफ-16, एफ-18 आदींसारख्या विमानांना चालविण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. इराकमधील युध्दात त्यांचा सहभाग होता.

भारताविषयी आत्मीयता :  राजा चारी यांचे बहुतांश आप्त अजूनही भारतात त्यातही आंध्रात आहेत. ते स्वत: अनेकदा भारतात आले आहेत. 2006 साली बंगळुरू येथील ‘एयर शो’मध्ये त्यांनी भाग घेतला होता. आजही भारताविषयी त्यांची नाळ जुडलेली आहे. 2012 साली त्यांनी आधी अंतराळ प्रवास यशस्वीपणे पार पाडणार्‍या सुनीता विल्यम्स यांची भेट घेतलेली आहे. यासाठी कराव्या लागणार्‍या खडतर परिश्रमांसाठी ते पूर्णपणे तयार आहेत. भारतातर्फे 1984 साली राकेश शर्मा, रवीश मल्होत्रा व नंतर कल्पना चावला, सुनिता विल्यम्स यांनी अंतराळ प्रवास केला आहे.

कठीण प्रक्रियेतून निवड
‘नासा’ने अलीकडेच अंतराळ मोहिमेसाठी 12 जणांची निवड केली आहे. यात राजा चारी यांच्यासह सात पुरूष तर पाच महिलांचा समावेश आहे. या सर्वांना 18,300 उमेदवारांमधून अत्यंत खडतर अशा चाचण्यांमधून निवडण्यात आले. ‘नासा’ची ही अंतराळविरांची 22वी बॅच असून ऑगस्ट महिन्यापासून या सर्वांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. सुमारे दोन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर या सर्वांना विविध मोहिमांवर पाठविण्यात येणार आहे.