फेरबदलात पालकमंत्रिपद पिंपरी-चिंचवडकडे जाण्याची शक्यता
पिंपरी/पुणे : पुढील सरकार आपले असेल की नाही हे माहीत नाही. तेव्हा आताच कामे उरकून घ्या, असा सल्ला आपल्या कार्यकर्त्यांना देणे पालकमंत्री गिरीश बापट यांना चांगलेच महागात पडण्याची चिन्हे आहेत. पालकमंत्र्यांविरोधात खासदार अनिल शिरोळे व खासदार संजय काकडे यांचे दोन्ही गट एकत्र आले असून, ना. बापट यांची राजकीय कोंडी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही खासदारांची नुकतीच भेटही झाली होती. खा. शिरोळे यांनी आतापासून लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु केली असून, 19 जानेवारीला पुणेकरांचा स्नेह मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला कोण कोण हजेरी लावते याकडे पुणेकरांचे लक्ष लागलेले आहे. तसेच, आगामी मंत्रिमंडळ फेरबदलात ना. बापट यांना गच्छंती देण्यासाठीही पुण्यातील एक गट सक्रीय झाला असल्याची माहिती वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली आहे. त्यादृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला आहे. साडेतीन वर्षे पुण्याला पालकमंत्रिपद भेटले आता, पिंपरी-चिंचवडला पालकमंत्रिपद देण्यात यावे, अशी मागणीही घेऊनही भाजपातील एक गट मुख्यमंत्र्यांकडे आपली मागणी रेटत असल्याचेही सांगण्यात आले. आ. लक्ष्मण जगताप यांची मंत्रिमंडळात वर्णी निश्चित असून, त्यांना पालकमंत्री करावे, असा या गटाचा आग्रह आहे.
बापटविरोधकांच्या हाती आयते कोलित!
पुण्यात झालेल्या डाळिंब परिषदेमध्ये पुढचे सरकार आपले असेल की नाही माहिती नाही. आताच कामे करून घ्या, असे वक्तव्य पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले होते. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. विरोधी पक्षांनीसुद्धा या संधीचा फायदा घेत बापटांनी भविष्यातील सत्य परिस्थिती कळत असल्याची टीका केली आहे. त्यामुळे आता शहरात बापटविरोधी गट अधिक सक्रिय झाला आहे. मागील आठवड्यामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री बापटांच्या वक्तव्यावर नाराज असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बापटविरोधी गटाला चांगलेच कोलित हातामध्ये मिळाले आहे. खासदार संजय काकडे यांनी नुकतीच खासदार शिरोळे यांची भेट घेतली होती. याविषयी शहरातील राजकीय परिस्थिती आणि लोकसभा आणि विधासनसभा निवडणुकांबाबत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पालकमंत्री बापट यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर अचानक शहरातील दोन्ही खासदारांची बैठक झाल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. बापट यांनी केलेल्या वक्तव्यावर काकडे यांनी उघड आक्षेप घेतला होता. शहरामध्ये आणि राज्यात भाजपची अत्यंत चांगली परिस्थिती असून, आम्ही पुन्हा सरकार स्थापन करू, असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला. पालकमंत्र्यांनी कशाच्या आधारावर हे वक्तव्य केले माहिती नाही; मात्र, याबाबत मुख्यमंत्रीच काय तो निर्णय घेतील, असेही काकडे यांनी म्हटले आहे.
खा. शिरोळे-खा. काकडेंत गुप्तगू!
मागील लोकसभा निवडणुकीमध्ये पुण्यातून गिरीश बापट इच्छुक होते; मात्र, अनिल शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे बापटांचे विरोधक आता एकत्र येत असल्याचे चित्र पुण्यात निर्माण होत आहे. अगोदर महापालिकेत काकडे गटाचे नगरसेवक बापटांच्या विरोधात उघड भूमिका घेत आहेत. यामुळे पालिकेत भाजपचे दोन गट निर्माण झाले आहेत. दीड वर्षावर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार अनिल शिरोळे यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, खासदार संजय काकडे यांच्याबरोबर यासंदर्भात शिरोळे यांनी चर्चा केली. निवडणुकीची रणनीती काय असावी, याशिवाय विधानसभा निवडणुकीत आठ विधानसभा मतदारसंघांत काय परिस्थिती आहे यावरदेखील दोन्ही खासदारांनी चर्चा केली. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून शिरोळे यांनी 19 जानेवारीला पुणेकरांचा स्नेहमेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला पुण्यातील सर्व घटकांना निमंत्रित करण्यात येणार असून, यानिमित्ताने शिरोळे यांनी लोकसभेची तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे.