शेंदुर्णी । येथील गरुड पतपेढी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विषयी एकेरी गर्विष्ठ भाषेत उल्लेख केला त्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. राज्यात आघाडी सरकार सत्तेत असतांना आम्ही जामनेर नगर पालिकेसाठी 30 लाखांची मागणी केली होती. परंतु तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ती अमान्य करून नाकारली होती. आता त्यांच्या नाकावर टिच्चून 300 कोटींचा निधी जामनेर शहरातील विविध प्रकारच्या विकास कामांसाठी आणल्याचे वक्तव्य जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांनी जामनेर येथे विकास कामाचे भूमिपूजन कार्यक्रमात बोलतांना केले होते. त्याचा समाचार आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते संजय गरुड, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, कार्याध्यक्ष किशोर पाटील यांनी घेतला.
यांची होती उपस्थिती
या पत्रकार परिषदेत तालुक्याचे राष्ट्रवादीचे जेष्ठनेते संजय गरुड, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, कार्याध्यक्ष किशोर पाटील, युवक तालुकाध्यक्ष योगेश भडांगे आदी कार्यकर्ते हजर होते. यावेळी सुनिल सुभाष शिंपी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच सागरमल जैन, शांताराम गुजर, तसेच विठ्ठल गरुड व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सुनिल शिंपी यांनी नियुक्ती पत्र स्वीकारून गावांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक गल्लीत शाखा उघडून पक्ष वाढीसाठी सदस्य नोंदणी सुरु करणार असल्याचे सांगितले.