निंबोल विजया बँक दरोडा: संशयिताची माहिती देणाऱ्यास एक लाखांचे बक्षीस

0

जळगाव : रावेर तालुक्यातील निंबोल येथील विजया बँकेच्या शाखेवर दोघांनी दरोड्याचा प्रयत्न केला होता. या दरम्यान संशयिताने केलेल्या गोळीबारात बँकेतील वरिष्ठ अधिकार्‍याचा मृत्यू झाला होता . गुन्ह्याला वर्ष उलटण्यात आले तरी अद्याप संशयित गवसलेले नाहीत . यातील एका संशयिताचे जिल्हा पोलीस दलाने गुरुवारी रेखाचित्र जारी केले असून त्याची माहिती देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.

संशयितांना अटक करण्याचे आव्हान असलेला गुन्हा

गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये निंबोल येथील विजया बँकेच्या शाखेवर डोक्यात हेल्मेट घालून दोघांनी दरोड्याचा प्रयत्न केला होता . दरोड्यादरम्यान संशयिताने बँकेतील अधिकाऱ्यावर गोळी झाडून त्याची हत्या केली होती . यानंतर संशयित पसार झाले होते . भरदिवसाच्या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे . वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही यात लक्ष घातल्याने गुन्ह्याचा उलगडा करुन संशयितांना अटक करण्याचे आव्हान होते . स्थानिक गुन्हे शाखेकडून अत्यंत कसोशीने या गुन्ह्याचा तपास करण्यात आला व येत आहे. गुन्हा दाखल झाल्यावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी पोलिसांची पथकेही रवाना झाली होती. मात्र स्थानिक गुन्हे शाखेसह विविध ठिकाणी रवाना पथकांना संशयित गवसले नव्हते. गुन्ह्यादरम्यान सीसीटीव्ही फुटेज मिळूनही संशयितांनी डोक्यात हेल्मेट घातले असल्याने त्यांना निष्पन्न करून अटक करण्याच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती.

माहिती देणाऱ्याचे नाव ठेवणार गोपनीय

संशयितांना पकडण्याचे आव्हान असलेल्या गुन्ह्यात अखेर जिल्हा पोलीस दलाने दोघांपैकी एका संशयिताचे रेखाचित्र जारी केले आहे . त्यात संशयिताच्या उंची शरीर बांधा या वर्णनासह संपूर्ण माहिती देण्यात आली आहे . संशयिताची माहिती देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. माहिती देण्याकरता स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. संशयिताची माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे .