माजी उपसरपंच विवेक ठाकरे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश
निंभोरा- ग्रामपंचायतीने अमृतमहोत्सवी 75 वर्षाचा कार्यकाळ पार करून सुद्धा गावाला स्वतःची इमारत नसल्याने ग्रामपंचायत भवन होण्यासाठी माजी उपसरपंच व जनसंग्राम बहुजन लोकमंचचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्या मंत्रालयात याबाबत मागणी प्रस्ताव सादर केला होता. या मागणीवरून जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सुद्धा निंभोरा गावी ग्रामविकास भवन बांधकामासाठी निधी देण्यात यावा म्हणून यासाठी ग्रामविकास मंत्र्यांना शिफारस केली होती. त्यानुसार राज्यात मंजूर झालेल्या नवीन ग्रामपंचायत भवनांमध्ये निंभोर्यांचा सुद्धा समावेश करण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
18 लाखांच निधी लवकरच मिळणार
स्वतंत्र ग्रामपंचायत भवन बांधून मिळावे यासाठी ग्रामविकास मंत्रालयाकडून गावाला सुमारे 18 लाख रुपये निधी लवकरच उपलब्ध होणार आहे. जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी सुद्धा निधी मंजूर होण्याच्या प्रस्तावासाठी वेळोवेळी सहकार्य केल्याचे ठाकरे यांनी कळवले आहे. एक हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींना 12 लाख तर त्यापुढील लोकसंख्येच्या गावाला 18 लाख निधी देण्याची योजना आहे. या योजनेतून सुमारे 16 हजार लोकवस्तीच्या निंभोरा या गावी सुद्धा भवन उभारले जाणार आहे. सध्या एका संस्थेच्या भाड्याच्या जागेत सुरू असलेले ग्रामपंचायत कार्यालय तोडके ठरते. त्यासाठी आपण मंत्रालयात स्वतः पाठपुरावा करून स्व. बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत भवन बांधकामासाठी निधी मंजूर करून घेतल्याचे ठाकरे यांनी कळवले आहे. याच पद्धतीने गावासाठी सुमारे 1.5 कोटी रुपयांची विकासकामे मंजूर व्हावीत म्हणून मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. हा निधी सुद्धा मंजूर होणार असून आगामी काळात या निधीतून गावातील 30 गल्ली रस्त्यांचे क्राँक्रिटीकरण, पाच चौकांत पेव्हर ब्लॉक बसवणे व नवीन प्लॉट भागात 12 ठिकाणी नवीन गटार बांधण्याची कामे प्रस्तावित असल्याचे माजी उपसरपंच विवेक ठाकरे यांनी नमूद केले आहे.