अनेकांचे घर संसार येणार उघड्यावर ; रहिवासी आक्रमक पवित्र्यात
निंभोरा बु.॥- निंभोरा ते खिर्डी रस्त्यादरम्यान स्टेशन परीसरात उड्डानपुल कामाचे नुकतेच उद्घाटन झाले असून येथील शेतकरी व जागा मालकांना त्यांच्या संपादीत जागेचा मोबदला देण्यात आला आहे परंतु एका जागा मालकाच्या जागेवर गेल्या 70 वर्षापासून भाडेकरू राहतात. भाडेकरूंनी स्वतःच्या खर्चाने 15 ते 16 घरे बांधली आहेत तसेच काही दुकानदार, केळी ग्रुप धारक भाडे भरून राहतात. ग्रामपंचायतीच्या नमूना नंबर आठमध्ये भोगवटा धारक म्हणून त्यांची नावे आहेत. असे असताना 3 रोजी रावेर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहाय्यक अभियंता यांच्याकडून सुमारे 47 जणांना 24 तासाच्या आत बांधकाम केलेली घरे, दुकाने काढून जागा मोकळी करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधितानी दखल न घेतल्यास 12 रोजी कोणतीही पूर्व सूचना न देता घरांसह दुकानांचे बांधकाम नष्ट करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत होणारा खर्च रहिवाशांकडून वसुल करण्याचेही नोटीसीत नमूद आहे.
रहिवाशांचा पर्यायी जागेसाठी आग्रह
पर्यायी जागा व मोबदला शासन देत नाही तोपर्यंत रहिवासी आपल्या ताब्यातील जागा सोडणार नाही, असा पवित्रा या नागरीकांनी घेतला आहे. रहिवासी या मागणीसाठी आक्रमक पवित्र्यात आहेत.
मागणीनंतरही दुर्लक्ष -राजीव बोरसे
उड्डानपुल उभारणीत बेघर होणार्या रहिवाशांनी 2017 मध्ये जिल्हाधिकारी तसेच फैजपूर प्रांताधिकारी, रावेर तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता, आदींना तोंडी माहिती वेळोवेळी देऊन आंदोलन, उपोषण न करता शांततेच्या मार्गाने आम्हाला पर्यायी जागा व मोबदला देण्याची मागणी केली होती. खासदार रक्षा खडसे यांच्याकडेही याबाबत न्यायाची मागणी करण्यात आली मात्र या नोटीसीमुळे या रहिवाशांना आता बेघर होण्याची वेळ आल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी बेघर होणार्या रहिवास्यांचे प्रश्न त्वरीत सोडावावत, अशी अपेक्षा राजीव बोरसे, सचिन गुल्हाने, बंसी राठोड, सागर चौधरी, सुरेश बोरसे, मोहन राठोड किरण मेढे, विनोद राठोड, मंगेश राठोड, आत्माराम पवार, देविदास राठोड, जीवन राठोड,राजेश कोटेश्वर, नीलेश राठोड, स्नेहल सोळंखे, गंगूबाई साळवे आदींनी व्यक्त केली आहे.