निंभोर्‍यातील मजुराचा पुलावरून पडल्याने मृत्यू

दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रासमोरील घटना ; रात्रभर पाण्यातच राहिला मृतदेह

भुसावळ : दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रासमोरील पुलावरून खाली पडल्याने
निंभोरा येथील रहिवासी व दीपनगर केंद्रात मजूर म्हणून कामास असलेल्या 54 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गजानन आनंदा खंडारे (54, निंभोरा, ता.भुसावळ) असे मयताचे नाव आहे.

पुलावरून पडल्याने मृत्यू
तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निंभोरा येथील गजानन आनंदा खंडारे (54) हे 30 रोजी सायंकाळी बाहेर पायी फिरायला गेले होते व दीपनगर केंद्राजवळील 500 मेगावॅट प्रकल्पाच्या गेटसमोरील उड्डाणपुलावरून जात असताना वादळ सुरू असल्याने त्यांच्या डोक्याला पुलाचे फाउंडेशनचे लोखंडी पाइप लागल्याने ते पुलाखाली पडले व रात्रभर पाण्यात राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, रविवारी रात्रीच्या सुमारास परिवारातील सदस्यांनी त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही मात्र सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह पुलाखाली आढळला. तालुका पोलिसांना याबाब माहिती कळताच पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलिस निरीक्षक रुपाली चव्हाण, पोलिस नाईक प्रेमचंद सपकाळे, हेड कॉन्स्टेबल श्यामकुमार मोरे, विशाल विचवे आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांच्या डोक्याला मार लागून पाण्यात बुडून मयत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत शशिकांत आनंदा खंडारे यांच्या खबरीनुसार तालुका पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शामकुमार मोरे हे करीत आहे.

वादळी वार्‍यात पुलाखाली पडल्याचा अंदाज
पोलिसांच्या माहितीनुसार दीपनगर प्रकल्पासमोर महामार्गाच्या उडड्ाणपुलाचे काम सुरू असून या ठिकाणी लोखंडी पाईप आणि इतर साहित्य पडून आहे. रविवारी सायंकाळी अचानक वादळी वार्‍यासह पाऊस झाल्याने गजानन खंडारे यांना मार लागून ते पुलाखाली पडले. त्यातचच पावसामुळे पुलाखाली पाणी साचल्याने रात्रभर पाण्यात पडून असल्याने त्यांचा मृत्यू झाला.