निकालाचा इशारा!

0

कर्नाटक विधानसभेनंतर आज देशभरात झालेल्या पोटनिवडणुकांचा निकाल म्हणजे भारतीय जनता पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सूचक धोक्याचा इशारा मिळाला असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. विरोधक एकत्र आले तर भाजपचा पराभव होऊ शकतो हा यूपीतल्या आधीच्या पोटनिवडणुकांचा संदेश आता कर्नाटकमार्गे ताज्या निकालातून स्पष्टपणे अधोरेखित झाल्याचेही दिसून येत आहे. यापासून धडा न घेतल्यास भाजपला पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवणे फारसे सोपे नसेल हेदेखील यातून स्पष्ट झाले आहे.

वास्तविक पाहता, प्रत्येक निवडणुकीचे स्वतंत्र मुद्दे असतात. यात अगदी वैयक्तिक उमेदवार, त्याचा पक्ष आदींसह अनेक मुद्दे निकालावर परिणाम करणारे असतात. यामुळे एखाद-दुसर्‍या निकालामुळे देशात अमुक-तमुक पक्षाच्या बाजूने वा विरुद्ध वातावरण असल्याचे आपण म्हणू शकत नाही. यातच भारतासारख्या अजस्त्र आकारमानाच्या देशात तर अशा प्रकारचे भाकीत करणे फारच अवघड आहे. मात्र, काही निवडणुकांचे निकाल हे आगामी कालखंडातील राजकीय घडामोडींची दिशा दर्शवणारे ठरतात. या अनुषंगाने कर्नाटकात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत गैर-भाजपवादाला मिळालेली बळकटी अवघ्या देशाने अनुभवली आहे. याचाच पुढील अध्याय या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून आपल्या समोर आला आहे. खरं तर, अवघ्या 4 लोकसभा आणि 10 विधानसभा जागांवरून देशाचा कल समजू शकणार नाही. तथापि, यातून भाजपविरोधाचा प्रयोग व्यापक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यातील सर्वात लक्षवेधी लढत अर्थातच यूपीतील कैराना येथील ठरली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने केलेले धार्मिक धु्रवीकरण या पक्षाला चांगलेच लाभदायी ठरले होते. ही लाट साधारणपणे त्या राज्यातील विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकली. मात्र, यानंतर भाजपच्या झंझावाताला रोखण्यासाठी एकत्र येण्याची गरज सपा व काँग्रेससोबत बसपलाही वाटू लागली. विधानसभेत आधीच सपा व काँग्रेसने आघाडी केली होती. त्यांना बसपची साथ मिळाली. यातून काही दिवसांपूर्वीच यूपीतल्या फुलपूर आणि गोरखपूर या मतदारसंघात विरोधकांनी दणदणीत यश संपादन केले. खुद्द भाजपच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात या पक्षावर नामुष्की ओढवली. याचीच पुनरावृत्ती कैरानात झाली आहे. या मतदारसंघात मुस्लीम समुदाय बहुसंख्य आहे. यामुळे येथून हिंदू स्थलांतर करत असल्याची आवई भाजपने उठवली होती. मात्र, भाजपच्या या खेळीचा येथील निकालावर कोणताही परिणाम झालेला नाही. यामुळे राष्ट्रीय लोकदलाच्या मुस्लीम महिला उमेदवार तबस्सुम यांनी भाजपच्या मृगांका सिंग यांचा दारुण पराभव केला. यामुळे उत्तर भारतात भाजपविरोधातील एकत्रीकरणाचा प्रयोग भविष्यात व्यापक होण्याची शक्यता आहे. यात सपा, बसपा व काँग्रेससोबत राष्ट्रीय लोकदलही येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोटनिवडणुकीतील दुसरा लक्षवेधी निकाल हा भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात लागला. येथे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची आघाडी असली, तरी भारिप-बहुजन महासंघाच्या उमेदवारामुळे मत विभागणी होण्याचा धोका होता. मात्र, मतदारांनी राष्ट्रवादीचे उमेदवार मधुकर कुकडे यांच्या पारड्यात आपला कौल दिला. ही जागा भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये दाखल झालेले नाना पटोले तसेच राष्ट्रवादीचे वजनदार नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती, तर भाजपकडून मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्‍न होता. मात्र, येथेही विरोधकांच्या एकीकरणाचा विजय झाल्याचे दिसून येत आहे. अर्थात भाजपविरोधात ‘एकास-एक’ या प्रकारात लढत झाल्यास भाजपचा पराभव करता येत असल्याचे या निकालाने दाखवून दिले आहे, तर विरोधक एकत्र नसल्यास भाजपला कसे लाभदायक ठरते हे पालघर लोकसभा मतदारसंघातील निकालाने दाखवून दिले आहे.

या मतदारसंघावर कधी काळी काँग्रेसचे वर्चस्व होते. सध्या मात्र भाजप, शिवसेनेसह काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी यांचा येथे हक्काचा मतदार आहे. यामुळे भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत विरोधकांनी एकत्रितपणे उमेदवार दिला असता, तर भाजपचा पराभव निश्‍चित होता. हे तर आपल्याला मतदानाच्या आकडेवारीवरूनच दिसून येईल. मात्र, असे न झाल्यामुळे भाजपचे आयात उमेदवार राजेंद्र गावित यांचा विजय झाला आहे. ही जागा शिवसेनेने अतिशय प्रतिष्ठेची केली होती. यासाठी चिंतामण वनगा यांच्या मुलास उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीच्या कालखंडात दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर यथेच्छ चिखलफेकदेखील केली. विशेष करून प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात याला दोन्ही बाजूंनी चांगलाच जोर चढला होता. यामुळे मुख्य लढत ही भाजप व शिवसेनेतच असून अन्य पक्ष खिजगणतीत राहणार नाही असे मानले जात होते. मात्र, बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेली मते ही भल्याभल्यांचा अंदाज चुकवणारी ठरली आहेत. अर्थात विरोधक एकत्र आले असते तर पालघरमध्येही भाजपचा पराभव निश्‍चित होता. मात्र, असे झाले नाही. यातून देशातील इतर राज्यांमध्ये भाजपविरोधात वज्रमूठ उगारण्यात येत असली, तरी महाराष्ट्रात अद्यापही काँग्रेस व राष्ट्रवादी वगळता अन्य पक्षांना याचे भान आलेले नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. याचमुळे देशभरात भाजपची पीछेहाट होताना पालघरमध्ये भाजपला थोडा फार दिलासा मिळाला आहे.दरम्यान, विधानसभेच्या 10 जागांवरील पोटनिवडणुकांमध्येही भाजपची कामगिरी फारशी सरस राहिलेली नाही. यूपीत सपाने एक जागा जिंकली तर बिहारमध्ये राजदने जेडीयूकडून एक जागा खेचून आणली.

काँग्रेसने मेघालयातील अंपथी व कर्नाटकातील राजराजेश्‍वरीनगर येथील जागा कायम राखल्या, तर पंजाबमध्ये भाजपचा सहकारी पक्ष असणार्‍या अकाली दलालाही हादरा बसला आहे. झारखंडमध्ये झामुमोने दोन जागा जिंकल्या, बंगालमध्ये तृणमूल तर तर केरळमध्ये कम्युनिस्टांनी एक जागा जिंकली. भाजपला फक्त उत्तराखंडमधील एका जागेवर विजय मिळाला आहे. यामुळे येथील निकालाचा कलदेखील भाजपविरोधाचाच राहिला आहे. येत्या काही महिन्यांमध्येच मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या अत्यंत महत्त्वाच्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. येथे तिन्ही ठिकाणी भाजपची सत्ता आहे. या पोटनिवडणुकीतील विजयामुळे विरोधकांच्या गोटात उत्साहाचे वारे संचारले आहेत. या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेस वगळता अन्य विरोधी पक्षांचे अस्तित्व फारसे नाही. यामुळे येथे भाजपची लढत थेट काँग्रेसविरुद्ध होणार आहे. यातील निकालातून देशात भाजपविरोधात वातावरण आहे का? याबाबत नेमकी दिशा कळणार आहे. अर्थात सध्याचे राजकीय वारे भाजपला अनुकूल नाहीत इतके तरी या पोटनिवडणुकीतील निकालाने स्पष्टपणे दर्शवले आहे.