फैजपूर। शहरातील मिल्लत नगर भागातील खिरोदा रोड परिसरातील गटारींचे बांधकांम निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाची मुदतही संपली आहे. त्यामुळे हे काम करणारे ठेकेदार निखिल भास्कर बोंडे यांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मुख्याधिकारी सुवर्णा ओगले (शिंदे) यांनी दिली. यावेळी संबंधित ठेकेदार याला वारंवार तोंडी सूचना व नोटीस दिल्यानंतरही काम सुरु केले नाही.
या कामासंदर्भात नागरिकांच्या असंख्य तक्रारी होत्या हे पाहता या कामाचे ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार असल्याची प्रक्रिया सुरु असून नगराध्यक्षा महानंदा होले यांना मुख्याधिकारी यांनी पत्र दिले असून यात सर्वसाधारण सभेत हा मुद्दा घेऊन काळ्या यादीत टाकण्यासंदर्भात सभेने निर्णय घ्यावा, असा आशय पत्रात आहे. याची प्रत जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनासुद्धा देण्यात आली आहे. या कारवाईमुळे मुदतीत काम न करणे व निकृष्ट काम करणार्या ठेकेदाराचे धाबे दणाणले आहे.