महिला वर्गातून नाराजी व्यक्त
निगडी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने महिलांसाठी शहरातील पहिले ई-टॉयलेट प्रायोगिक तत्वावर निगडी बस स्टॉप येथे उभारण्यात आले होते. हे ई-टॉयलेट महिलांसाठी उपयुक्त ठरत होते. परंतु, अचानक पालिका प्रशासनाने शनिवारी (दि.16) हे टॉयलेट तेथून हलविले आहे. त्यामुळे महिलांची गैरसोय होत आहे. यामुळे महिला वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाची वाढत चाललेली दुरवस्था व त्याच्या स्वछतेसाठी लागणारा भरमसाठ निधी याचा ताळमेळ बसत नसल्यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. स्वच्छता व सफाई कामाचा ठेका दिलेले ठेकेदारही आपल्या कामात कामचुकारपणा करत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यामुळे प्रायोगिक तत्वावर निगडी येथे उभारण्यात आलेले ई-टॉयलेट महिलांसाठी उपयुक्त ठरत होते.
निगडी चौक हा वर्दळीचा चौक आहे. निगडी येथून पुण्यासह शहराच्या विविध भागात पीएमपीएमल बस सुटतात. त्यामुळे याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी असते. शौचालय नसल्यामुळे महिलांना अडचण येत होती. मे. सॅमटेक क्लिन अँड केअर प्रा.लि कंपनीने स्वखर्चाने निगडी स्थानक येथे महिलांसाठी ई-टॉयलेट बसविले होते. या जागेवर जाहिरात व लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन शौचालयाचा देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च पुढील 7 वर्षे कंपनीकडून भागविला जाणार होता. त्यासाठी जागा, पाणी, वीज व सांडपाण्यासाठीची व्यवस्था महापालिका करत आहे. हे टॉयलेट महिलांसाठी उपयुक्त ठरत होते. परंतु, शनिवारी (दि.16) हे ई-टॉयलेट अचानक स्थलांतरित करण्यात आले आहे. यामुळे महिलांची गैरसोय होत आहे.
दहा लाखाचे नुकसान
याबाबत बोलताना स्थानिक नगरसेवक उत्तम केंदळे म्हणाले, निगडीत पीएमपीएमएलचे मोठे बस स्थानक आहे. त्यामुळे या चौकात वर्दळ असते. याठिकाणी महिलांसाठी स्वछतागृह नव्हते. त्यामुळे स्थायी समिती सदस्य असताना महिलांसाठी शहरातील पहिले ई -टॉयलेट याठिकाणी बसविण्यात आले. परंतु, महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या बाजुला हे टॉयलेट नको, अशी रजपूत समाजाची मागणी होती. त्यामुळे हे टॉयलेट काढण्यात आले आहे. तथापि, यामुळे पालिकेचे दहा लाखाचे नुकसान झाले आहे. महाराणा प्रताप यांच्या पुतळा परिसराच्या पाठीमागे सुलभ शौचालय आहे. हे शौचालय देखील येथून हलविण्यात यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली.
रजपूत समाजाची मागणी
अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे म्हणाले की, महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या बाजुला हे टॉयलेट नको, अशी रजपूत समाजाची मागणी होती. त्यामुळे हे टॉयलेट काढण्यात आले आहे. हे ई -टॉयलेट बसविण्यासाठी जागेचा शोध सुरु आहे. जागा, ड्रेनेज लाईन, पाणी आणि वीज या सुविधा पाहून टॉयलेट बसविण्यात येणार आहे. पिंपळेसौदागर येथील कोकणे चौकात हे ई -टॉयलेट स्थलांतरित करण्याचे नियोजन आहे.