बेकायदा कब्जा करणार्‍यांवर कारवाई करावी-आयुक्त 

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी सेक्टर क्रमांक 23 वाहतूकनगरी येथील आरक्षित वाहनतळावर बेकादेशीरपणे कब्जा करणार्‍यांवर कारवाई करण्याचा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. तसेच वाहनतळाचा ताबा कोणाकडे आहे, याचा शोध घेण्यात यावा. वाहनतळाची पाहणी करावी, याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडे देण्यात आली आहे. स्थायी समितीच्या विषयपत्रिकेवर चिखली येथे वाहनतळ विकसित करण्याचा विषय होता. त्या अनुषंगाने निगडीतील वाहनतळ कोणाच्या ताब्यात आहे. त्याची माहिती देण्याची मागणी राजू मिसाळ यांनी केली. त्यावर प्रभाग अधिकारी आशादेवी दुरगुडे यांनी भुमी व जिंदगी विभागाकडून निविदा काढण्याचे काम सुरु असल्याची माहिती दिली. तथापि, ताबा नेमका कोणाकडे याची माहिती त्यांना देता आली नाही. भूमी जिंदगीच्या विभागाच्या अधिकार्‍यांने देखील ताबा कोणाकडे आहे, याची माहिती नसल्याचे उत्तर दिले.

अधिकार्‍यांना माहिती नाही

त्यावर मिसाळ म्हणाले, महापालिकेच्या मिळकतीचा ताबा कोणाकडे आहे, त्याचा वापर कोण करत आहे, याची अधिकार्‍यांना माहिती नाही. हे खेदजनक आहे. वाहनतळाचा बेकायदेशीरपणे वापर केला जात आहे. पार्किंग केलेल्या ट्रक चालकांकडून पावत्या फाडल्या जातात. त्याला कोण वालीच राहिला नाही. तिथे येणार्‍या अवजड वाहनांमुळे भक्ती-शक्ती चौकातील वाहतूककोंडीत भर पडत आहे. त्यामुळे ही मोठी खेदजनक गोष्ट आहे. येथे वाहनतळावर ही बेकायदा पार्किंग केले जात आहे. या वाहनतळाचा होत असलेला गैरवापर महापालिका अधिकार्‍यांच्या लक्षात आली नाही.

पाहणी केली जाईल

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, वाहनतळाचा ताबा कोणाकडे आहे. त्याचा शोध घेण्यात येईल. वाहनतळाची पाहणी केली जाईल. याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडे दिली आहे. बेकायदेशीरपणे कब्जा, पार्किंगच्या पावत्या फाडणार्‍यांवर कारवाई केली जाईल. या कामाचा ठेका देण्यात यावा असा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा प्रस्ताव आला होता. परंतु, काम दिले गेले नाही. येत्या 15 दिवसात त्याचा सविस्त अहवाल येईल. त्यासाठी भुमी व जिंदगी विभागाने निविदा मागविली आहे. तसेच वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी लेन तयार करण्यात येईल.