निगडीतील 5 जणांचा भीषण अपघातात मृत्यू

0

पुणे । पुणे-सोलापूर मार्गावर इंदापूर तालुक्यातील डाळज येथे स्कॉर्पिओ जीपचा टायर फुटून भीषण अपघात झाला. निगडी यमुनानगर येथे राहणार्‍या गायकवाड कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. तुळजापूर येथून पुण्याकडे परतत असताना शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजता हा अपघात झाला. टायर फुटल्यानंतर कारवरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणार्‍या वाहनाला कारने जोरदार धडक दिली व अपघात घडला. अपघातातील सर्व जखमींना भिगवण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत व जखमींची नावे उशीरापर्यंत समजली नव्हती. मदतीसाठी महामार्ग व भिगवण पोलीस घटनास्थळी दाखल होते.

मृत व जखमींची नावे
शितल संदीप गायकवाड (32), संदीप प्रकाश गायकवाड (40), आभिराज संदीप गायकवाड (5), सुनिता प्रकाश गायकवाड (58), प्रकाश रामचंद्र गायकवाड (67, सर्व राहणार नाना नानी पार्क, यमुना नगर निगडी) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. यात पती-पत्नी, मुलगा, सून व नातू यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये प्रमोद प्रकाश गायकवाड (वय 32), हेमा प्रमोद गायकवाड (वय 29) यांचा समावेश आहे.

गाडीचा टायर फुटला
अपघाताची भीषणता इतकी तीव्र होती की, गाडीचा चक्काचूर झाल्याने दोन जणांचे मृतदेह गॅस कटरने गाडीचा पत्रा कापून एक तासानंतर बाहेर काढण्यात आले. स्कॉर्पिओ गाडी सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे जात होती. डाळज नंबर 1 गावचे हद्दीत आली असता, गाडीचा टायर फुटला आणि ही गाडी पाच पलट्या खात सोलापूर बाजूकडे जात असलेल्या दुसर्‍या गाडीवर धडकली. भरधाव वेग हाच अपघाताला कारणीभूत ठरला. अपघाताचा आवाज येताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच माहिती मिळताच, भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नीळकंठ राठोड, पोलीस कर्मचारी रमेश भोसले, सचिन जगताप, गोरख पवार, वाघ, यांसह महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

भरधाव वेगाने घेतले बळी
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघात होत आहेत. भरधाव वेग अन पुढे जाण्याची स्पर्धा यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. चारचाकी वाहने ससरासरी 140 वेगाने जातात. या वेगामुळे टायर गरम होऊन फुटणे, ब्रेक निकामी होणे. यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र याकडे महामार्ग प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.