निगडी : इतिहासप्रेमी मंडळ, पुणे आणि मातृमंदिर विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पानिपतचा रणसंग्राम’ या विषयावर मनोहर सभागृह, ज्ञानप्रबोधिनी, निगडी येथे गुरुवार, दि. 13 ते दि. 16 डिसेंबर 2018 या कालावधीत भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये, अफगाण बादशाहचे भारतावर आक्रमण, महाराष्ट्राचा पराभव, पानिपतची लढाई आदी ऐतिहासीक घटनांचा रणसंग्राम उलगडण्यात आला. गुरुवार ते शनिवार सकाळी दहा ते रात्री नऊ आणि रविवारी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत विद्यार्थी आणि सर्व नागरिकांसाठी प्रदर्शन खुले ठेवण्यात आले होते.
थरारक चित्रफितींद्वारे युद्धकथा…
हे देखील वाचा
इतिहासाचे अभ्यासक, व्याख्याते आणि प्रदर्शनाचे निर्माते मोहन शेटे, मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे कार्यवाह यशवंत लिमये आणि ज्ञानप्रबोधिनी, निगडी केंद्र उपप्रमुख मनोज देवळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. इतिहासप्रेमी मंडळ, पुणे आणि मातृमंदिर विश्वस्त संस्था यांनी आयोजित केलेल्या या ऐतिहासिक प्रदर्शनात तीस फूट लांबीच्या भव्य पटलावर दृक-श्राव्य माध्यमातून अभ्यासपूर्ण निवेदन आणि थरारक चित्रफितींच्या साहाय्याने पानिपतची युद्धकथा उलगडण्यात आली. इतिहासप्रेमी, नागरिक आणि विशेषतः विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेटी दिल्या.
पानिपत ही शौर्याची गाथा…
प्रदर्शनाविषयी निर्माते मोहन शेटे म्हणाले की, दिनांक 14 जानेवारी 1761 या दिवशी भारतमातेच्या मंगलभूमीवर आक्रमण करणार्या अफगाण बादशहा अहमदशहा अब्दालीशी झुंज देण्यास राष्ट्ररक्षक मराठे उभे ठाकले. महाभयंकर युद्ध झाले. महाराष्ट्राची तरुण पिढी कापली गेली. सव्वा लाख बांगडी फुटली. या युद्धात महाराष्ट्राचा पराभव झाला, हे खरे असले तरी देशाच्या रक्षणासाठी मराठे कशाप्रकारे पराक्रमाचे रणतांडव करू शकतात, हे सार्या जगाने अनुभवले म्हणून पानिपत ही पराभवाची कथा नसून शौर्याची, धैर्याची, त्यागाची, जिद्दीची आणि राष्ट्रभक्तीची ती गाथा आहे.