निगडी । श्री राम सेवा मंडळाच्या वतीने 28 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान निगडीत श्रीरामनवमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच लहान मुलांसाठी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. निगडी, प्राधिकरणात हा महोत्सव होणार आहे. मंगळवारी (दि. 28) रोजी सायंकाळी पाच वाजता शारदा भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी सात वाजता ‘स्वरमुग्धा’ प्रस्तुत ‘सुगम व भक्ती संगीत’ हा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी (दि. 29) सायंकाळी पाच वाजता नवचैतन्य महिला भजनी मंडळाचा तर, सात वाजता ‘हास्यमैफल’ हा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी (दि. 30) सायंकाळी पाच वाजता स्वरगंध भजनी मंडळाचा तर, सात वाजता ‘अ आ आई’ कथाकथन होणार आहे.
अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन
शुक्रवारी (दि. 31) सायंकाळी पाच वाजता शामकल्याण भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार असून, पंडित शौनक अभिषेकी सात वाजता ‘अभंगवाणी’ सादर करणार आहेत. एक एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता मीराबाई काटमोरे व सहकार्यांचा भजनाचा कार्यक्रम होणार असून सात वाजता ‘राम रतन धन पायो’ हा कार्यक्रम होणार आहे. 2 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता चैतन्यसुधा भजनी मंडळाचा तर सात वाजता ‘जिंकलो ऐसे पायो’ याविषयावर संजय उपाध्ये यांचे प्रवचन होणार आहे.
3 एप्रिलला गीत रामायण
3 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता दुर्गेश्वर भजनी मंडळाचा तर 7 वाजता ‘गीत रामायण’चा कार्यक्रम होणार आहे. चार एप्रिल रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत ह.भ.प अश्विनी इनामदार यांचे कीर्तन होणार आहे. दुपारी बारा वाजता श्रीराम जन्म व महाप्रसाद होणार असून सायंकाळी 5 वाजता वरदा महिला भजनी मंडळाच्या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार आहे. 29 मार्च रोजी सर्वांसाठी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत रांगोळी स्पर्धा आणि दोन एप्रिल रोजी मुलांसाठी चित्रकला स्पर्धा होणार आहे.