निगडीपर्यंतच्या खर्चासाठी महापालिका सक्षम

0

पिंपरी-चिंचवड : निगडीपर्यंत मेट्रो मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास महामेट्रो रेल कॉर्पोरेशनला सांगितले आहे. त्याचा खर्च पिंपरी महापालिका करणार आहे. डीपीआर तयार झाल्यानंतर येणार्या खर्चाचा भार पेलण्यास महापालिका सक्षम आहे. झपाट्याने वाढणार्या शहरासाठी भविष्यातील गुंतवणूक म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे, असे महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

डीपीआरनंतर वाढीव खर्चाचा निर्णय
शहरात केवळ दापोडी ते पिंपरी या 7.20 किलोमीटर अंतरादरम्यान पुणे मेट्रोचे काम सुरू आहे. पहिल्याच टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेण्याची मागणी केली जात आहे. पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गाचा डीपीआर बनविण्यास मेट्रोला सांगितले आहे. त्याचा सुमारे 40 ते 50 लाख खर्च महापालिका मेट्रोस देणार आहे. वाढीव खर्चाची बाब महापालिकेची आर्थिक क्षमता पाहून घेतला जाईल. शहर झपाट्याने वाढत आहे. शहरात विकास करण्यासाठी मोठी संधी आहे. भविष्यातील गुंतवणुक म्हणून ही बाब शहराच्या हिताची आहे. निगडीपर्यंत मेट्रोचा आर्थिक भार पेलण्यास पालिका सक्षम आहे. मेट्रोकडून डीपीआर तयार झाल्यानंतर त्यासंदर्भात ठरविले जाईल, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

वल्लभनगर स्थानकाला हवी आहे जागा
वल्लभनगर येथील स्थानकासाठी महापालिका पाण्याचा टाकीजवळील जागा देण्यास तयार आहे. मात्र, त्यांना दुसरीकडील जागा हवी आहे. त्याचबरोबर मेट्रोने एकूण 12 जागांची महापालिकेकडे मागणी केली आहे. शक्य असलेल्या जागा त्वरित मेट्रोला दिल्या जाणार आहेत. उर्वरित जागेबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. या संदर्भात गुरुवारी बैठक होती. मात्र, ती काही कारणामुळे रद्द झाली असून पुन्हा त्याबाबत लवकरच बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.