सामाजिक एकतेचा नवीन पायंडा; शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
निगडी : येथील ‘एक गाव एक शिवजयंती’ नुकतीच साजरी करण्यात आली. यामध्ये निगडी, लक्ष्मीनगर, साईनाथ नगर आणि यमुनानगर मधील सर्व गणेश मंडळांनी सहभाग घेतला. या संपूर्ण परिसरात शिवजयंती निमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. ज्यामध्ये लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, गडकिल्लांचे ड्रोनद्वारे काढलेले छायाचित्र प्रदर्शन, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा व नागरिकांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले. अशा उपक्रमांमुळे समाजामध्ये एकता निर्माण होण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. रविवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती.
बाल-व्याख्यात्यांची रसाळ सुरवात
बाल-शिव व्याख्यात्यांच्या ओघवत्या व रसाळ वाणीने महाराजांच्या पराक्रमाला उजाळा देत शोभायात्रेची सुरवात, अंकुश चौक निगडी येथून करण्यात आली. तर यात्रेची सांगता समर्थ मित्र मंडळ यमुनानगर येथे करण्यात आली. शोभायात्रेमध्ये ठीक-ठिकाणी पथनाट्याद्वारे अवयवदान, व्यसनमुक्ती यांचे महत्व पटवून देण्यात आले. शोभायात्रेच्या मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. प्रत्येक चौकात फुलांची उधळण करण्यात आली. शोभायात्रेमध्ये ढोल, ताशे व शौर्य वाद्य वाजवण्यात आले.
‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना जशी मूळ धरू लागली आहे. तशीच आता ‘एक गाव, एक शिवजयंती’ ही कल्पना देखील लोकांना आवडते आहे. गावातील सर्व गणेश मंडळे, सार्वजनिक संस्था, संघटना आदी सर्व एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात आणि सकारात्मक शिवजयंती साजरी करू लागले आहेत. हे खरच कौतुकास्पद आहे. सर्व शिवभक्त पारंपरिक वेशात डोक्यावर भगवी टोपी, फेटे व खांद्यावर उपरणे परिधान करून सहभागी झाले. महिला व तरुणींनी भगवे फेटे परिधान करून फुगड्यांचे फेर धरत कार्यक्रमाची शोभा वाढवली. विविध मंडळांनी शोभायात्रेचे स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीने आणि नागरिकांना सरबत, पाणी वाटपाने केले.
कार्यक्रमाचे आयोजन अखिल निगडी, लक्ष्मीनगर, साईनाथ नगर व यमुनानगर मधील सर्व गणेश मंडळे, प्रतिष्ठान, आजी व माजी नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक, महिला बचत गट, भजनी मंडळे, व्यापारी वर्ग, शिक्षण संस्था व विविध क्षेत्रातील सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी केले. निगडी परिसरामध्ये एक गाव एक शिवजयंती माध्यमातून निघालेल्या शोभायात्रेची शिस्त व आयोजन पाहून परिसरातील विविध स्तरांमधून आयोजकांवर कौतुकाचा वर्षाव झाला.