निगडी उड्डाणपुलास भक्ती शक्ती उड्डाणपुल असे नाव द्या

0

सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांची मागणी

निगडी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने भक्ती-शक्ती चौक येथे उड्डाणपुल बांधण्यात येत आहे. निगडीमध्ये असलेल्या भक्त-शक्ती समुहशिल्पाची आठवण म्हणून या उड्डाणपुलास जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुल असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.

अद्वितीय कार्याची जाण ठेवून
खैरनार यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी येथील भक्ती-शक्ती चौक हा सर्वपरिचित आहे. स्वराज्य स्थापनेसाठी संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अमुल्य आहे. त्यांचे महत्वपुर्ण कार्य जनसामान्यांना जिवन जगण्याची एक नवी प्रेरणा देतात. संत, महात्मे, युगपुरुष हे केवळ उपदेश न करता स्वत:च्या आचरणाचे आदर्श समाजापुढे ठेऊन समाजाला सन्मार्ग दाखवितात. ‘आधी केले मग सांगितले’ याच उक्तीप्रमाणे ते वर्तन करतात. त्यामुळे त्यांची शिकवण सर्व जग शिरोधार्य मानते. याच अद्वितीय कार्याची जाण ठेवत महापालिकेकडून भक्ती-शक्ती समुहशिल्पात संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एैतिहासिक भेटीचे डोळे दिपवणारे, तेजस्वी स्मारक उभारण्यात आले आहे.

पिलरवर अंभगांच्या ओळी असाव्यात
विशेष म्हणजे याच निगडी भक्ती-शक्ती चौक येथून जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळयाचे वारकरी सांप्रदायासह शहरात आगमन होते. अवघ्या महाराष्ट्रासह देश-विदेशातील जनसमुदाय हा संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी निगडी येथे जमलेला असतो. त्यामुळेच संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून भक्ती-शक्ती चौक येथे बांधण्यात येणार्‍या उड्डाणपुलास जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज (भक्ती शक्ती) उड्डाणपुल असे नाव देण्यात यावे. उड्डाणपुलाच्या खांबांवरती (पिलरवर) संत तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या ओळी तसेच संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवनकार्यातील महत्वपुर्ण घडामोडींचे चित्र रेखाटण्यात यावे.