निगडी, चाकणपर्यंत मेट्रो नेण्याच्या हालचाली गतिमान!

0

प्रकल्पाचा अहवाल आठ महिन्यात तयार करणार
अहवालासाठी चार कोटीचा खर्च; प्रस्ताव स्थायी समिती समोर

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेने पिंपरी ते निगडी आणि नाशिक फाटा ते चाकण या मार्गावर मेट्रो सुरू करण्याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. हा डीपीआर तयार करण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी लागणार असून, त्यासाठी तब्बल 4 कोटी 31 लाख रूपये पुणे महामेट्रोला देण्यात येणार आहेत. या बाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. मेट्रो प्रकल्पाच्या भाग दोनसाठी डीपीआर तयार करण्याकरिता सिस्ट्राईकॉम इजिस राईटस या संस्थेची सेवा घेण्यात येत असून, डीपीआर तयार करण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तसेच 3 कोटी 84 लाख अधिक 12 टक्के जीएसटी म्हणजेच 4 कोटी 31 लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. ही रक्कम महापालिकेच्या सन 2018-19 च्या अर्थसंकल्पातील केंद्र सरकार पुरस्कृत योजना आणि युटीएफ लेखाशिर्षावरील 50 कोटी तरतुदीमधून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

डीपीआरचा खर्च महापालिका देणार
पिंपरी ते निगडी आणि नाशिक फाटा ते चाकण या मार्गावर मेट्रो सुरू करण्याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा. तसेच नाशिक फाटा ते खेड या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मेट्रोसाठी जागा ठेवून काम करावे, अशी लोकप्रतिनिधींची मागणी आहे. त्या अऩुषंगाने हालचाली सुरु झाल्या आहेत. महापालिकेतील विविध प्रश्नांबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कार्यालयात आमदार आणि महापालिका पदाधिकार्‍यांसमवेत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीस महाराष्ट्र मेट्रोरेल कॉर्पोरेशन आणि राष्ट्रीय राज मार्ग प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पिंपरी ते निगडी आणि नाशिक फाटा ते चाकण हा मेट्रो मार्ग वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली. या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याबाबत मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला सूचना देण्यात आल्या. तसेच महापालिकेमार्फत मेट्रो कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठवून डीपीआर तयार करण्याचा खर्च महापालिका देणार असल्याबाबत कळविण्यात आले. याबतच्या प्रस्तावावर आगामी स्थायी समितीच्या बैठकीत मोहर उमटवली जाणार आहे.

पेजला साडेतीन लाख ’लाइक’
पुणे मेट्रोच्या फेसबुक पेजने अवघ्या 16 महिन्यांमध्ये साडेतीन लाख लाइक्सचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम केला आहे. नागपूर मेट्रोच्या फेसबुक पेजला तीन लाख लाइक्स मिळण्यासाठी 28 महिन्यांचा कालावधी लागला होता. त्या तुलनेत पुणे मेट्रोच्या कामाच्या प्रगतीचे विविध टप्पे, त्याची माहिती फेसबुकवरून दिली जात असल्याने त्याला पिंपरी-चिंचवड, पुणेकरांकडून उत्तम प्रतिसाद लाभत आहे. मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करून शहरवासीयांची अपेक्षापूर्ती करण्याचा प्रयत्न महामेट्रोने स्पष्ट केले.