पिंपरी-चिंचवड : निगडी ते दापोडी या बीआरटीएस मार्गाचे काम अंतिम टप्यात आहे. येत्या पाच दिवसात काम पुर्ण होईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविल्यास प्रत्यक्षात या मार्गावर बीआरटीएस बस धावेल, असेही त्यांनी सांगितले. दापोडी-निगडी बीआरटीएस अतीजलद बस सेवा मार्गावर मंगळवारी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी महापौर नितीन काळजे, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक सचिन चिखले, नगरसेविका कमल घोलप, सह शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, ज्ञानदेव जुंधारे, उपअभियंता विजय भोजने आदी उपस्थित होते.
अंडर पासिंग, डेडिकेटेड लेन अद्याप नाही
हर्डीकर म्हणाले, निगडी ते दापोडी या बीआरटीएस मार्गाचे काम पुर्ण होत आले आहे. चिंचवड स्टेशन ते पेट्रोल पंप, मोरवाडी चौक ते आंबेडकर चौक, फोर्स मोटर ते खंडोबा माळ चौक, नाशिक फाटा ते कासारवाडी अंडरपास आणि फुगेवाडी अंडरपास ते फुगेवाडी पुल येथे एका बाजुने ’डेडिकेटेड’ लेन उभे करायचे राहिले आहेत तर नाशिक फाटा आणि खंडोबा माळ चौकात दोन्ही बाजूंनी ‘डेडिकेटेड’ लेन उभे करायचे राहिले आहेत. हे काम वेगात सुरु असून लवकरच पुर्ण होईल.
पार्किंग निविदेला मिळाला नाही प्रतिसाद
पार्किंगसाठी निविदा काढली असून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दोनवेळा निविदा रि-कॉल केली आहे. मर्ज इन आणि मर्ज आऊटच्या रबर मोल्ड करण्यात येणार आहे. त्यामुळे स्पीड लिमिट होईल. पाच दिवसांची कामे शिल्लक आहेत. सर्व स्थानके अद्ययावत तंत्रज्ञानाने जोडली आहेत. या संदर्भातील सुरक्षा अहवाल आयआयटी पवईकडून लवकरच अपेक्षित आहे. त्याचे काम शनिवार (दि.6) पासून सुरु होत आहे. अहवाल आल्यानंतर उच्च न्यायालयात माहिती दिली जाईल. न्यायालयाची परवानगी मिळताच प्रत्यक्षात या मार्गावर बीआरटीएस ही सेवा सुरू केली जाणार आहे, असे हर्डीकर यांनी सांगितले.