प्रशासनाच्या अादेशानुसार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून कार्यवाही
जळगाव – नवी दिल्ली भागातील निजामुद्दीन येथे झालेल्या धार्मिक समुदायाच्या कार्यक्रमाहून जिल्ह्यात परतलेल्या तसेच त्याबाबतची माहिती लपविणाऱ्या नागरिकांच्या चौकशीचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिले असल्याची माहिती मिळाली आहे. या गोष्टीला पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दुजोरा दिला नसला तरीही मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनासह जिल्हा प्रशासनाच्या सर्व आदेशानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी दै. जनशक्तिशी बोलतांना सांगितले.
विविध राज्यामधील नागरिकांची उपस्थिती
देशभरात सध्या दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तबलिघी जमात परिषदेमुळे भीतीचे वातावरण आहे . 13 ते 15 मार्च दरम्यान फक्त देशातील विविध राज्यांमधूनच नव्हे तर परदेशातूनही लोक हजर होते . त्यांनी निजामुद्दीनमधील तबलिघी मारकझला भेट दिली . दरम्यान , येथे जमलेल्या बऱ्याच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे . या परिषदेत सहभागी झालेल्या 9 जणांचा मृत्यू झाला आहे , तर 441 जणांमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसून आलीत , अशी माहिती दिल्ली सरकारने दिली आहे.
त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर प्रत्येक जिल्ह्यात निजामुद्दीन येथुन परतलेल्या नागरिकाचा शोध तसेच चौकशी करुन त्यांची तपासणी करावी व संबंधितांचा जसा अहवाल प्राप्त होईल त्यानुसार त्यांचे विलगीकरण करण्यासह त्यांना क्वारंटाईन करण्याचे आदेश आहेत.
जिल्ह्यातीलही नागरिकांची होती उपस्थिती
दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तबलिघी जमात परिषदेला जळगाव जिल्ह्यातुनही धार्मिक समुदायाचे नागरिक उपस्थित होते. कुठलीही तपासणी न करता संबंधित नागरिक परतले अाहेत. तसेच त्याबातची माहिती परतलेले संबंधित नागरिक माहिती लपवित असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात अशा नागरिकांचा शोध तसेच चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दिले आहेत. दरम्यान या नागरिकांचा वेळीच शोध घेण्यात येवुन त्यांची तपासणी करावी. जेणेकरुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलता येतील, अशीही मागणी सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनासह जिल्हा प्रशासनाच्या प्रत्येक आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे-
डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक , जळगाव