मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील नितीन आगे हत्याप्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष सुटल्याने राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आगेच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी 1 जानेवारीपासून राज्यभर भव्य आंदोलन उभारणार असल्याचा इशारा अर्थतज्ज्ञ व काँग्रेसचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकरांनी दिला आहे.
सोमवारी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले यावेळी मुणगेकर बोलत होते. आझाद मैदानात झालेल्या आंदोलनात आगे कुटुंबीय सहभागी होणार होते. मात्र स्थानिक आमदारांनी नितीनच्या वडिलांवर दबाव आणून त्यांना आंदोलनात पोहोचू दिले नाही, असा गंभीर आरोप मुणगेकरांनी केला. शिवाय, 6 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची धार कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोपही मुणगेकरांनी केला.