पुराव्याअभावी जिल्हा न्यायालयातून सुटका
अहमदनगर : राज्यभर गाजलेल्या खर्डा (ता. जामखेड) येथील नितीन आगे हत्याप्रकरणातील दहा आरोपींची पुराव्याअभावी जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष सुटका केली. आरोपींमध्ये तीन अल्पवयीन आरोपी होते, त्यांची यापूर्वीच सुटका झाली आहे. 28 एप्रिल 2014 रोजी प्रेमप्रकरणातून हे हत्याकांड घडले होते. नितीन हा गावातील शाळेत बारावीला शिकत होता.
काय होते प्रकरण…
नितीन आगे या युवकाला आरोपींनी शाळेतून मारहाण करत आरोपींच्या विटभट्टीवर नेऊन तेथे अमानुष मारहाण केली होती. तसेच डोंगरातील झाडाला त्याला गळफास दिला होता, अशी फिर्याद जामखेड पोलिस स्टेशनला देण्यात आली होती. गावातील आरोपी सचिन उर्फ आबा हौसराव गोलेकर, शेषराव रावसाहेब येवले, नीलेश गोलेकर, विनोद अभिन्यू गटकळ, भूजंग सूर्यभान गोलेकरसह 13 जणांविरुद्ध हत्या करणे, तसेच अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले होते. राज्यभरात खर्डा येथील हत्या प्रकरण गाजले होते. या प्रकरणी दलित संघटनांना आक्रमक झाल्या होत्या. या खटल्यात सव्वीस साक्षीदार होते.
साक्षीदार फितूर झाले…
शाळेतील वर्गातून नितीन आगेला आरोपी मारहाण करून घेऊन गेले होते. शाळेचे शिपाई व शिक्षक हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. त्याचे जबाब ही पोलिसांनी नोंदविले होते. परंतु, प्रत्यक्षात न्यायालयात या सर्वांनी योग्य साक्ष न दिल्याने सरकारी पक्षाकडून सर्वांना फितूर म्हणून जाहीर केले होते. गावातील इतर साक्षीदार ही फितूर झाले होते. नितीनचे वडिल राजू, आई यांच्याही या खटल्यात साक्ष नोंदवण्यात आल्या होत्या. मात्र, आरोपींविरुध्द पुरावे सिद्ध न झाल्याने सर्व आरोपींना न्यायालयाने निर्दोष ठरवले. नितीन आगे हत्याप्रकरणात सामाजिक संघटना आणि दलित संघटनांनी आवाज उठविल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी हा खटला जलदगती न्यायालयात चालेल, विशेष सरकारी वकीलाची नेमणूक केली जाईल, असे आदेश दिले होते. हा खटला जलदगती न्यायालयात चालला नाही. त्यात विशेष सरकारी वकिलाची नेमणूक झाली नाही.