नितीन गडकरी यांनी घेतली सलमान खानच्या वडिलांची भेट

0

मुंबई – केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी माजी चित्रपट अभिनेते व पटकथा लेखक तथा सलमान खान यांचे पिता सलीम खान यांची भेट घेतली. गडकरींच्या ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियानानिमित्तच्या या भेटीदरम्यान सलमान खानदेखील उपस्थित होता. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी २९ मे पासून ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियानाला सुरुवात केली आहे. या अभियानाद्वारे विविध महत्वाच्या व्यक्तींना मोदी सरकारच्या चार वर्षांच्या विकासकामांची माहिती देण्यात येत आहे.

यापूर्वी अमित शाह यांनी माजी आर्मी चीफ जनरल दलबीर सिंह यांची त्यांच्या गुरुग्राम येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षित, उद्योजक रतन टाटा व शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचीदेखील भेट घेतली. दरम्यान गडकरी आज येस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर व अभिनेते नाना पाटेकर यांचीदेखील भेट घेणार आहेत. शाह यांनी भाजपच्या कार्याचा आलेख घेऊन ५० जणांच्या भेटी घेण्याचा निर्णय घेतला असून प्रत्येक भाजप कार्यकर्त्याने १० जणांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.