काही न करणार्यांना साध्वी प्रज्ञासिंह यांचा अजब सल्ला
औरंगाबाद : इतर धर्मांचे वर्चस्व रोखण्यासाठी व हिंदू धर्माचे अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्माला घालावे. जे लोक देशासाठी काहीच करत नाहीत त्यांनी किमान मुलांना तरी जन्माला घालावे, असा अजब सल्ला साध्वी प्रज्ञासिंह यांनी दिला आहे. औरंगाबाद येथे जनुभाऊ रानडे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भगवा रंग त्यागाचा या विषयावर साध्वी प्रज्ञासिंह बोलत होत्या.
जबाबदारी आम्ही घेऊ
साध्वी प्रज्ञा म्हणाल्या, मुलांच्या भरण-पोषणाची क्षमता नाही म्हणून एकाच मुलावर थांबण्याचा निर्णय घेऊ नका. बाहेरून आलेल्या कित्येक लोकांना नाही तरी आपण देशात खाऊ-पिऊ घालत आहोत. तुमच्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. हिंदूंची लोकसंख्या न वाढल्यास आगामी काळात इतर धर्म अतिक्रमण करतील. हिंदूंचे अस्तित्व धोक्यात येईल. शिवाजी महाराजांनी सहा लग्न केल्याचा दाखला देत प्रज्ञासिंह यांनी देशासाठी एकापेक्षा अधिक लग्न केले तरी चालेल, असे वक्तव्य केले. मुलांना बहीण-भाऊ नसल्यामुळे आजकाल मुलांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केल. मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता करण्याचे कारण नाही, असेही त्या म्हणाल्या.