बंगळुरू । तीन देशांच्या निमंत्रित स्पर्धेसाठी भारतीय पुरुष हॉकी संघ जर्मनीला रवाना झाला आहे. पुढील महिन्यात होणा-या हॉकी विश्व लीग उपांत्य फेरीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून मनप्रितसिंहच्या नेतृत्वाखाली 18 खेळाडूंचा भारतीय संघ जर्मनी व बेल्जियमविरुद्ध दोन-दोन सामने खेळेल. हॉकी विश्व लीगसाठी संघ 9 जून रोजी लंडनला पोहोचेल. तेथे ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिना आणि ग्रेट ब्रिटनविरुद्ध सराव सामने खेळणार आहे.
दोन आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण
डसेलडोर्फ येथे 1 जूनपासून सुरू होणा-या या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचे दोन आठवड्यांचे प्रशिक्षण शिबिर बंगळुरु येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर पूर्ण झाले. जर्मनीला रवाना होण्यापूर्वी मनप्रितसिंहने सांगितले की, ‘आम्ही सराव सामन्यांकडे नेहमी गंभीरतेने पाहतो. कारण या सामन्यांमुळे आगामी स्पर्धेसाठी खेळाडूंना लय गवसते. लीगमध्ये आम्ही कोणत्याही संघाला कमजोर समजणार नाही. आमचे लक्ष्य विजय नोंदवून तीन गुण संपादन करण्याचे असेल. यामुळे दमदार कामगिरी करून आमचे लक्ष्य मिळविण्याचा आमचा प्रयत्न राहील असे तो म्हणाला. विश्व लीगमध्ये भारतीय संघाचा 15 जून रोजी स्कॉटलंडशी, 17 जून रोजी कॅनडाशी, 18 जून रोजी पाकिस्तानशी तर 20 जून रोजी नेदरलॅँड्सशी सामना होणार आहे.