फॉगिंग मशीन बंद : डबक्यांमध्ये रॉकेल, ऑईल टाकण्याची मागणी
इंदापूर : निमसाखर ग्रामपंचायतीने 14व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून फॉगिंग मशीन खरेदी केली असून महिन्यांतून एकदा सर्वत्र धुरळणी करण्यात येते. परंतु, ही मशीन सध्या बंद अवस्थेत असल्याने किटकांचा उपद्रव वाढला आहे. अवकाळी पावसामुळे गाव परिसरात पाण्याची डबकी साचल्याने डासांचे प्रमाणही वाढले आहे. फॉगिंग मशीन दुरूस्ती होत नसेल तर डासांची पैदास रोखण्यासाठी डबक्यात रॉकेल किंवा ऑईल टाकण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. या परिसरातील वाड्या-वस्त्यांवर डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळून आले आहेत.
थंडी, तापाचे रुग्ण वाढले
अवकाळी पावसामुळे गावात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. अशा डबक्यांमध्ये डासांची पैदास वाढत आहे. त्यातच सध्या रात्रीची थंडी, पहाटे दव आणि दुपारी कडाक्याचे ऊन, असे वातावरण आहे. यामुळे संसर्गजन्य आजार वाढले आहेत. अंगदुखी, डोकेदुखी यासह थंडी-तापाचे रुग्ण आढळत असल्यामुळे परिसरातील दवाखाने फुल्ल असल्याचे चित्र आहे. डासांचे वाढते प्रमाण आणि परिसरातील अस्वच्छता यामुळे रुग्णांची संख्याही वाढत असल्याने ग्रामपंचायतीने फॉगिंग मशीनही तातडीने दुरुस्त करून सर्वत्र धुरळणी करावी, अशी मागणी होत आहे.