नियमांची एैशीतैशी करणार्‍या शहरातील 88 रिक्षांवर कारवाई

0

17 हजार 900 रुपयांचा दंड ; फ्रन्ट सीट
बसलेल्या तरुणीचा झाला होता मृत्यू

जळगावः विद्यापीठातून शहरात परतत असताना फ्रंट सीट बसलेल्या विद्यापीठ कर्मचारी विद्यार्थीनीचा महामार्गावर पडल्यानंतर कंटेनरने चिरडल्याने मृत्यू झाला होता. या पार्श्‍वभूमिवर नियमांची अंमलबजावणी न करणार्‍या रिक्षांचालकांवर शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यात महामार्गासह शहरातील विविध भागांतून 88 रिक्षा जमा करण्यात येवून शहर वाहतूक शाखेत आणण्यात आला. यातून एकूण 17 हजार 900 रुपयांचा दंड वसूल झाला आहे.

शहर वाहतूक शाखेतर्फे वेळोवेळी रिक्षांची तपासणी करण्यात येत असते. काही दिवसांपूर्वी रिक्षातून पडून विद्यार्थीनींचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक देवीदास कुनगर यांनी मंगळवारी बेशिस्त तसेच वाहतुकीचे नियम न पाळणार्‍या रिक्षांवर कारवाई केली.

रिक्षाचालकांची भरली वाहतूक शाखेत जत्रा
रिक्षांचा थांबा सोडून वाहन थांबविणे, रस्त्यातच प्रवासी बसविणे, विमा नाही, ओव्हरलोड प्रवासी, ड्रेस न वापरणे, कागदपत्रे नसणे अशाप्रकारे रिक्षाचालकांकडून नियम पाळले जात नाही. त्याला अनुसरुन महामार्ग तसेच शहरातील विविध चौकात तसेच भागात शहर वाहतूक कर्मचार्‍यांनी तपासणी करुन एकूण 88 रिक्षा शाखेत जमा केल्या. यात 10 रिक्षा चालकांकडे ड्रेस नसल्याने त्यांना प्रत्येकी 200 रुपये दंड करण्यात आला. अशाप्रकारे सर्व रिक्षाचालकांकडून 17 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रिक्षा घेवून जाण्यासाठी रिक्षाचालकांची सायंकाळी शहर वाहतूक शाखेत जत्रा भरली होती. तसेच रिक्षाचालकांनी पाळावयाच्या नियमांबाबत सुचना पत्रक काढण्यात आले असून ते रिक्षाथांब्यावर चिटकविण्यात येणार असल्याचे पोलीस निरिक्षक देवीदास कुनगर यांनी सांगितले.