प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा शुभेच्छा कार्यक्रम उत्साहात
निगडी : अभियांत्रिकीचे शिक्षण अभ्यास करणार्यास सोपे आहे तर टाळाटाळ करणार्यास अवघड आहे. महाविद्यालयीन तासांना नियमित उपस्थिती, अभ्यासाचे नियोजन आणि काटेकोर परिश्रम याद्वारे परीक्षेमध्ये हमखास यश मिळते, असे मत नूतन महाराष्ट्र संस्थेचे विश्वस्त राजेश म्हस्के यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा कार्यक्रमात ते बोलत होते. विभाग प्रमुख प्रा. रामदास बिरादार, विद्यार्थी विकसन अधिकारी प्रा. विजय नवले, प्रा. नितीन धवस, प्रा. श्याम इंगळे, प्रा. मनोज काटे, प्रा. नीता कराडकर आदी उपस्थित होते.
एखाद्या विद्यार्थ्याला यापूर्वी किती गुण मिळाले होते, यापेक्षा तो विद्यार्थी आज किती आणि कसा अभ्यास करतो, यावर त्याचे भवितव्य अवलंबून असते, असे मत बिरादार यांनी केले. याप्रसंगी ऋतुजा अरगडे, ऋशिकेश घरदाळे, वैभव शेवाळे आणि खुशबू काटे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अभ्यासाच्या तंत्रांविषयी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. वर्षभर सर्व तासांना शंभर टक्के हजेरी असणार्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना भसे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. आनंद दौलताबाद यांनी केले.