नियम धाब्यावर बसवून अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक

0

महसूल प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले लक्ष : रात्रीच्या वेळीही सर्रास वाहतूक

भुसावळ- सुनसगाव ते बोदवड रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून सरकारी नियम धाब्यावर बसवून अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक सुरू आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी वाहतूक सुरू असल्याने त्रस्त नागरीकांनी प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी दोन वाहने तहसील प्रशासनाने ताब्यात घेत पंचनामा केला. दोषींवर आता तहसील प्रशासन काय कारवाई करणार? याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे. अवैध गौणखनिजाचा रेवटा (जाड रेती) ची वाहतूक होत असताना तहसीलदारांसह पथकाने कुर्‍हा पानाचे येथे सायंकाळी साडेसात वाजता दोन डंपर जप्त केले.

नियम धाब्यावर बसवून सर्रास गौण खनिजाची वाहतूक
सुनसगाव, गोजोरा, कुर्‍हा, मोंढाळा, शिंदी, विचवा, धानोरी, भानखेडा, बोदवड मार्गे रात्रीच्या वेळेस महसुल विभागाची कार्यालयीन वेळ संपल्यानंतर एका कंन्स्ट्रक्शन्स कंपनीकडे भाड्याने 25 ते 30 डंपर वाहने गेल्या कित्तेक महिन्यांपासून अवैधरीत्या चोरीच्या उद्देशाने गौणखनिज (रेवटा) जाड रेतीची सुनसगाव येथील वाघूर नादी पात्रामधून वाहतूक करीत असल्याची तहसील विभागाकडे तक्रार होती त्या अनुषंघाने 24 रोजी संध्याकाळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या आदेशानंतर महसूल विभागाने पथकाने सापळा रचून कुर्‍हा येथे (एम.एच 19 झेड. 9696) व (एम.एच. 19.झेड. 2122) या दोन वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गौण खनिज आढळल्याने पथकातील अधिकार्‍यांनी वाहनचालक आणि मालक यांचा जाबजबाब घेऊन दोन्ही वाहने गौण खनिजासह जप्त केली.

महसूल प्रशासनाची भूमिका संशयास्पद ?
भुसावळ शहर व तालुक्यात वाळूसह गौण खनिजाची अहोरात्र वाहतूक सुरू असताना कारवाई मात्र तक्रारीनंतर नावालाच होत असल्याने नागरीकांमध्ये आश्‍चर्य व संताप व्यक्त होत आहे. अवैधरीत्या वाळू वाहतूकदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश असताना प्रत्यक्षात मात्र केवळ दंडात्मक कारवाई केली जात आहे. सुनसगाव नदीपात्रातून होणार्‍या गौण खनिजाची अवैध वाहतुकीबाबत प्रशासन आता कारवाई करणार की नाही? याकडे आता तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.