नवी दिल्ली । भारतीय क्रिकेटमध्ये नियुक्तीवरून सुरू असलेला वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. सपोर्ट स्टाफमध्ये झहीर खान आणि राहुल द्रविडच्या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या क्रिकेट प्रशासकांच्या समितीने बैठकीत रेड सिग्नल दाखवला आहे. राहुल आणि झहीर यांच्या नावाच्या केवळ शिफारशी आल्या असून मुख्य प्रशिक्षिक रवी शास्त्री यांच्याबरोबर मुंबईत होणार्या चर्चेनंतरच या दोघांच्या सहभागाविषयी निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी सांगितले आहे. सल्लागार समितीकडून सपोर्ट स्टाफमध्ये राहुल आणि झहीरची नावे सुचवण्यात आली आहेत पण प्रशिक्षकांशी चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे क्रिकेट प्रशासकांच्या समितीने स्पष्ट केले.
फक्त मुख्य प्रशिक्षक निवडीची जबाबदारी
भारतीय संघाच्या सल्लागार समितीने प्रशासक समितीला पत्र लिहून सपोर्ट स्टाफमध्ये राहुल आणि झहीरच्या नियुक्तीबाबत सांगितले होते. मात्र सल्लागार समितीकडे केवळ मुख्य प्रशिक्षक पदाच्या निवडीची जबाबदारी असताना सहयोगी स्टाफच्या मुद्द्यात हस्तक्षेप केलेला प्रशासक समितीला रुचला नव्हता. सहयोगी स्टाफ निवडण्याची अंतिम जबाबदारी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर आहे. शास्त्री हे आता स्वत:च्या पसंतीच्या लोकांना सहयोगी स्टाफमध्ये ठेवण्यास आग्रही आहेत. झहीर खान गोलंदाजी कोच असताना शास्त्री निकटवर्तीय भरत अरुण यांच्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे.
भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची निवड झाल्यानंतर सर्व काही आलबेल होण्याची चिन्हे दिसत असतानाच प्रशासक समितीने झहीर आणि राहुलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. आता येत्या 22 जुलैला झहीर आणि राहुल द्रविड संबंधी अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याआधी बीसीसीआयचे अध्यक्ष सीके खन्ना, अमिताभ चौधरी, डायना इडुलजी, राहुल जोहरी यांच्या समितीची 19 जुलैला बैठक होणार आहे. बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी सल्लागार म्हणून झहीरची करण्यात आलेली नियुक्ती फलंदाजी सल्लागार राहुल द्रविडप्रमाणे दौरा विशेष असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, यावर प्रशासक समितीने आक्षेप घेतला आहे.
व्यवस्थापक पदासाठी मागवले अर्ज
बीसीसीआयने टीम इंडियाच्या व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागविले असल्याची माहिती देखील मिळाली आहे. या अर्जासाठी 21 जुलै ही अंतिम तारीख सांगण्यात आली आहे. ही नियुक्ती वर्षभरासाठी असेल. फस्ट क्लास क्रिकेट तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंना प्राथमिकता देण्यात येणार असल्याचे समजते.
शास्त्री यांची पसंती अरुण
गोलंदाजी कोच म्हणून शास्त्री यांची पसंती अरुण यांनाच होती. पण सल्लागार समितीने झहीरच्या नावाला संमती दिली. गोलंदाजी कोचची नेमणूक करतेवेळी सीएसीने शास्त्री यांना विश्वासात घेतले नसल्याचेच यावरून स्पष्ट होत आहे. पूर्णकालीन कोच म्हणून संघाला 250 दिवस देण्याची अट आहे. तर झहीर 150 दिवसांसाठी उपलब्ध होऊ शकणार असल्याची माहिती मिळाली होती. मात्र आता 21 तारखेपर्यंत यावर देखील अनिश्चितताच आहे. झहीरच्या वेतनाचे पॅकेज अद्याप निश्चित झाले नाही. गोलंदाजी प्रशिक्षकाऐवजी झहीरला गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती करावी अशी शास्त्रींची भूमिका आहे. झहीरकडे भरपूर माहिती आहे पण कोचिंगचा अनुभव नाही. झहीरच्या तुलनेत भारत अरुण यांच्याकडे गोलंदाजीतल्या ज्या तांत्रिक गोष्टी, बारकावे आहेत त्याचा अनुभव जास्त आहे असे शास्त्री यांचे मत आहे. दरम्यान गांगुली आणि शास्त्री यांच्यातील मतभेदामुळे देखील हा वाद निर्माण झाला असल्याची शक्यता क्रिकेट अभ्यासक व्यक्त करत आहेत.