मुंबई (निलेश झालटे): राज्यात अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून सुरु असणारा गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. ‘क्रीम पोस्टिंग’साठी विविध विभागांमध्ये कमालीचा गोंधळ सुरु असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत अन्न व औषध प्रशासन विभागातील नव्याने नियुक्त झालेले वर्ग अ च्या अधिकाऱ्यांची संवर्गानुसार वाटप केलेल्या ठिकाणी पदस्थापना न करता इतर ठिकाणी नियुक्ती केल्याचा प्रकार संबंधित विभागाच्या शासन आदेशावरून उघड झाला आहे. यामध्ये बृहन्मुंबई परिक्षेत्रात पदस्थापनेसाठी अधिकारी जास्त इच्छुक असल्याचे दिसून आले असून उपलब्ध पदसंख्येच्या ८० टक्के जागा विदर्भात भरण्याचे आदेश असतानाही आदेशाचे उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
मुंबईची ओढ का?
प्रशासनात विदर्भामध्ये अन्न व औषधी प्रशासनात रिक्त पदांची संख्या खूप आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र असाधारण भाग चार अ १५ जून, २०१७ च्या सामान्य प्रशासन विभागाच्या पत्रानुसार विदर्भात रिक्त पदे अधिक असल्याने उपलब्ध पद्संख्येच्या ८० टक्के पदे नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक या विभागांमध्ये भरण्याबाबत सांगितले आहे. मात्र ३१ ऑगस्टच्या शासन आदेशामध्ये नियुक्त केलेल्या 3 अधिकाऱ्यांची नियुक्ती ही वाटप केलेल्या विभागात न करता मुंबईमध्ये केली आहे. सबंधित आदेशामध्ये 3 पैकी 2 अधिकाऱ्यांची नियुक्ती नागपूर-2 मध्ये केली असतांना देखील त्यांची पदस्थापना बृहन्मुंबई येथे केली आहे.
तात्पुरती नियुक्तीही विदर्भात नको!
३१ ऑगस्टच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या शासन आदेशानुसार अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिनस्त सहायक आयुक्त (अन्न) गट अ या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पत्राद्वारे १९ अधिकाऱ्यांची नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यापैकी १३ उमेदवारांची परिविक्षाधीन सहायक आयुक्त म्हणून तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र यातील तीन उमेदवारांची नियुक्ती संवार्गानुसार वाटप केलेल्या ठिकाणी न करता त्यांनी दिलेल्या पसंतीच्या ठिकाणीच केली असल्याचे उघड झाले आहे. तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती असताना देखील अधिकारी विदर्भात जाण्यास अनुच्छुक असल्याचे या प्रकारामुळे समोर आले आहे. दरम्यान या नियुक्त्यांमध्ये काही गौडबंगाल असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.