जळगाव। महानगर पालिकेचे आयुक्त जीवन सोनवणे हे निवृत्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे मनपाचे प्रभारी आयुक्तपद देण्यात आले आहे. प्रभारी आयुक्त म्हणून त्यांनी शुक्रवारी 14 रोजी सकाळी शहरातील साफसफाईची तपासणी केली. तपासणीत त्यांना मनपातर्फे नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी आणि प्रत्यक्ष वार्डात काम करणार्या कर्मचार्यांच्या संख्येत तफावत आढळून आली. वार्डनिहाय 20 ते 25 कर्मचारी साफसफाईसाठी नेमलेले असताना पाहणी दरम्यान 5 ते 7 कर्मचारी आढळून आल्याने त्यांनी त्या वार्डाच्या सुपरवायझरला बोलावून कर्मचार्याविषयी विचारपूस केली व अनेक ठिकाणी रस्त्यावर कचरा दिसून आल्याने सुपरवायझराला नोटीस देण्याच्या सुचना केल्या. तसेच महापालिकेची परवानगी न घेता सार्वजनिक रस्त्यांवर बांधकामाचे साहित्य ठेवणार्या बांधकाम व्यावसायिक, खाजगी बांधकाम करणार्यांना नोटीसा देण्याचेही आदेश प्रभारी आयुक्तांनी दिले.
बांधकाम ठेकेदारांना नोटीस
अनेक ठिकाणी बांधकामाचे साहित्य सार्वजनिक रस्त्यांवर तसेच महापालिकेच्या जागांवर ठेवण्यात आल्याचे आढळून आल्याने संबंधितांनी महापालिकेची परवानगी घेतली आहे किंवा कसे याची चौकशी करण्याचे आदेश महापालिकेच्या अधिकार्यांना दिले. परवानगी घेतली नसल्यास तात्काळ दंड आकारण्याबाबत संबंधित अधिकार्यांना सांगितले. बांधकाम मटेरीअल यापुढे रस्त्यांवर टाकलेले आढळल्यास नागरिकांविरोधात कारवाईचे आदेश दिले.
वार्डनिहाय केली तपासणी
प्रभारी आयुक्त निंबाळकर यांनी वार्ड क्र. 19 मधील बहिणाबाई उद्यान, शिक्षकवाडी, गणेश कॉलनी, तसेच वार्ड क्र. 10 मधील रिंगरोड , रेल्वे लाईनलगतचा बजरंग बोगदा, श्रीकृष्ण कॉलनी आदि भागात पाहणी केली. यावेळी आ. सुरेश भोळे, उपायुक्त चंद्रकांत खोसे, लक्ष्मीकांत कहार, आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील उपस्थित होते. आयुक्तांना पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी सांडपाण्याच्या गटारींमध्ये कचरा पडल्याने त्या बंद झाल्याचे दिसून आले. या गटारी स्वच्छ करण्याचे आदेश त्यांनी दिले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमागील नाल्या, खॉजामिया दर्गा परीसरातील नाल्याची तसेच रेल्वे लाईनच्या परिसराचीही पाहणी त्यांनी केली. भाजी विक्रेते कचरा जवळच्या नाल्यात टाकत असल्याची तक्रार असल्याने भाजी विक्रेत्यांना कचरा कुंडीतच टाकण्याच्या सुचना देण्याचे आदेश दिले.
साफसफाईंचे सोंग
प्रभारी आयुक्त जिल्हाधिकारी शहरातील सर्व प्रभागाची तपासणी करणार असल्याचे वृत्त पसरल्याने शहरात नुकतीच साफसफाई केल्याची दिसून येत होते यावरु साफसफाई केले गेल्याचे दिसून आले आहे. एरवी न फिरकणार्या महापालिकेच्या कचरा गाडी परिसरात फिरताना दिसत असल्याचे स्थानिक नागरीकांनी यावेळी सांगितले. शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेबरोबरच स्थानिक नागरीकांची असून त्यांना महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन प्रभारी आयुक्तांनी केली. जिल्हाधिकारी स्वतः साफसफाईची पाहणी करण्यासाठी वार्डावार्डात फिरत असल्याने नागरीक समाधान व्यक्त केले.