जळगाव : पदाधिकार्यांमध्ये समन्वय नसल्याने जिल्हाच्या विकासाकरीता जिल्हा परिषदेकडे मंजूर निधी खर्चाबाबत नियोजन होत नसल्याची स्थिती आहे. गेल्या पाच महिन्यापासून 51 कोटींचा मंजूर निधी नियोजना अभावी पडून आहे. नियोजीत निधी वेळेवर खर्च न झाल्यास निधी परत जाण्याची भिती प्रशासकीय अधिकार्यांमध्ये आहे. दरम्यान शुक्रवारी 15 रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या शासकीय निवासस्थानी नियोजनाच्या चर्चेसाठी पदाधिकार्यांसह अधिकार्यांना चहा पाण्यासाठी बोलविण्यात आले होते. यावेळी मंजूर निधी व प्राप्त निधीबाबतची माहिती प्रशासनाकडून घेण्यात आली, तसेच करावयाची कामे यावर चर्चा झाल्याची माहिती अतिरिक्त सीईओ संजय म्हस्कर यांनी दिली. यावेळी सर्व पदाधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.
अतिरिक्त सीईओं दिली माहिती
अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर यांनी जिल्हा नियोजनकडून मंजूर निधी व सर्व देयकानंतर शिल्लक असलेल्या निधीबाबत माहिती दिली. तसेच लवकर नियोजन केल्यास विहीत मुदतीच्या आत निधी खर्च करता येईल अन्यथा मंजूर निधी परत जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी पदाधिकार्यांच्या निदर्शनात आणून दिले. पदाधिकार्यांसमोर त्यांनी हेड निहाय असलेल्या निधीची माहिती सादर केली. जनसुविधा योजनेंतर्गत मंजूर असलेल्या 2.45 कोटी, 30/54, 50/54 हेंड अंतर्गत रस्त्यासाठी 20 कोटी, जिल्हा नियोजनकडील 51 कोटीबाबत नियोजन करावयाचे आहे. मात्र पदाधिकार्यांमध्ये अधिकचे कामे मिळविण्यासाठी चढाओढ सुरु असल्याने निधी नियोजनाचे घोड अडून पडले आहे. अध्यक्ष बंगल्यावर निधी नियोजनाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते.