नियोजन बैठकीवर क्रीडा शिक्षकांचा बहिष्कार

0

भुसावळ। सन 2017- 18 मध्ये तालुक्यात घेण्यात येणार्‍या क्रीडा स्पर्धांचे नियोजन करण्यासाठी बुधवार 5 रोजी पंचायत समितीमध्ये बैठक नियोजित करण्यात आली होती. मात्र, जिल्हा क्रीडा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेने या बैठकीवर बहिष्कार टाकला. यानंतर संघटनेने जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांना निवेदन देण्यात आले.

क्रीडा शिक्षकांची पदे धोक्यात
यंदाच्या शैक्षणिक वर्षात क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्या उपस्थितीत सभेचे नियोजन होते. राज्य शिक्षण आयुक्तांनी 28 एप्रिल 2017 रोजी कला, शारीरिक शिक्षण विषयाच्या तासिका निम्म्याने कमी करून विद्यार्थी खेळाडू शारीरिक शिक्षण शिक्षकांवर अन्याय केला. यामुळे अनेक क्रीडा शिक्षकांची पदे धोक्यात आली आहेत. 28 एप्रिलचे परिपत्रक मागे घेत नाही, तोपर्यंत सन 2017- 18 मध्ये आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा आणि त्यानुषंगाने होणार्‍या बैठका-सभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भुसावळ पंचायत समितीत झालेल्या बैठकीवर शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेने बहिष्कार टाकला. जिल्हाध्यक्ष प्रदीप साखरे, राजेंद्र कुळकर्णी, रुपा कुळकर्णी, बी.एन. पाटील, आर.आर. धनगर, पी.व्ही. अत्तरदे, ए.जे. पठाण यांसह तालुक्यातील 40 शिक्षकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांना निवेदन दिले.