नियोजन समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

0

४० जागांपैकी २१ जांगावर राष्ट्रवादी विजयी; भाजप दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष

पुणे । जिल्हा नियोजन समितीच्या एकूण ४० जागांपैकी २१ जांगावर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळविले आहे. त्यांपैकी १६ बिनविरोध आणि ५ जागा मतदानाद्वारे जिंकून जिल्हा नियोजन समितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व राखले आहे. राष्ट्रवादीनंतर भाजप हा दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरला असून १४ जागांवर त्यांनी वर्चस्व मिळविले आहे. तर गटबाजीमुळे शिवसेनेला फटका बसला आहे.

काँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी २ उमेदवार तर १ अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या ४० पैकी ३४ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित ६ जागांसाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. मंगळवारी दुपारी विधानभवन येथे मतमोजणी पार पडली. यावेळी अनिता तुकाराम इंगळे, अर्चना प्रविण कामठे, वैशाली प्रतापराव पाटील, स्वाती दत्तात्रय पाचुंदकर या राष्ट्रवादी काँग्रेसचे चार उमेदवार जिल्हा निर्वाचन मतदान संघ अर्थात परिषद मतदारसंघातून निवडून आले.

खासदार, आमदारांच्या गटबाजीमुळे शिवसेनेचे नुकसान
शिवसेनेचे खासदार शिवाजीराव अधळराव पाटील आणि मंत्री विजय शिवतारे यांच्यातील गटबाजीच्या राजकारणामुळे शिवसेनाला मोठे नुकसान झाले आहे. शिवसेनेची मते गटबाजीच्या राजकारणामुळे फुटली शिवसेनेची तीन मते फुटल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला.

नियोजनामुळे पक्षाला यश
जिल्हा नियोजन समितीमध्ये सर्वाधिक २१ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या असल्याने जिल्ह्याच्या नियोजन ठरविण्याचा अधिकार निवडून आलेल्या उमेदवारांना मिळाला आहे. पक्षाला विजय मिळविण्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या नियोजनामुळे पक्षाला यश मिळाले. – जालिंदर कामठे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादीचे सातव विजयी
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या पत्नी रेखा बांदल या अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. पालिका मतदारसंघातील एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसचेच सचिन सदाशिव सातव विजयी झाले.

शलाका कोंडे यांना सर्वांत कमी मते
अनिता इंगळे, अर्चना कामठे, वैशाली पाटील, स्वाती पाचुंदकर यांना पहिल्या पसंतीची १३ मते मिळाली. त्या मतांचे मूल्य १३०० इतके होते़ १२३४ पेक्षा जास्त मूल्य असलेले उमेदवार विजयी झाले. पहिल्या फेरीत शिवसेनेच्या शलाका कुलदीप कोंडे यांना मते मिळाली नाही. त्यांची मते हस्तांतरीत करता येत नव्हती. प्रथम क्रमांकाने विजयी झालेल्या उमेदवारांची दुसर्‍या क्रमांकाच्या पसंतीची मते हस्तांतरीत करण्यात आली. विजयी उमेदवारांची मते हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया शेवटपर्यंत केली तरीही कोणी निवडून आले नाही. शलाका कोंडे यांना सर्वात कमी मते होती. त्यांना एक क्रमांकाचे मतदान कोणीच दिले नाही म्हणून त्यांची मते हस्तांतरीत केली नाहीत. त्यामुळे त्यांना वगळण्यात आले. त्यानंतर झेंडे आणि बांदल हे दोन उमेदवार होते त्यांपैकी झेंडे यांना ११०० मूल्य होते तर बांदल यांना १११० इतके मूल्य होते. त्यामुळे बांदल यांना विजयी म्हणून घोषित केले.