नियोजित जागी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमीपुजन करा

0

चाळीसगाव । शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील धुळे रोड व स्टेशन रोड यामधील त्रिकोणी जागेत महाराष्ट्र शासनाच्या कला संचनालया यादीत असलेल्या पुतळ्याच्या संकल्पने नुसार भव्यदिव्य असा छत्रपती शिवाजी महाराज उभे जवळ तोफ, ध्वज, मावळा, बाल संभाजी व छावा असा पुतळा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याठीकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भूमीपूजन करावे व तसा कार्यक्रम आराखडा तयार करुन जाहीर करावा अन्यथा 4 जुलै 2017 रोजी मुख्यमंत्री चाळीसगाव दौर्‍यावर आल्यास त्यांना घेराव घालणार असल्याचा इशारा संभाजी सेनेच्या वतीने तहसिलदार व पोलीस निरीक्षक चाळीसगाव यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

21 दिवस उपोषण करूनही कामास अजूनही दिरंगाई
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा या मागणीसाठी संभाजी सेना अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा करीत लढा देत असून शेकडो पत्रव्यवहार केला आहे. या जागेवर सदर पुतळा उभारणीस परवानगी मिळावी याकरिता 19 फेब्रुवारी 2016 शिवजयंती दिनापासून संभाजी सैनीकांनी 21 दिवस उपोषण करून एक प्रचंड असे जन आंदोलन उभे केले होते.

सदरआंदोनामध्ये तालुक्यातील जवळपास सर्वच पक्ष, संघटना, व्यापारी बांधव, जेष्ठ नागरिक, तरुण, बालगोपाल, विद्यार्थी, विदयार्थीनी, माता भगिनी, शेतकरी अशा विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सर्व सामान्य जनतेने लाखोंच्या संख्येने आंदोलन स्थळी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून पुतळा व्हावा यासाठी समर्थन दिलेले आहे. त्यानंतर आपण न.पा.निवडणूकीसाठी 21 नोव्हेंबर 2016 रोजी बलराम व्यायाम शाळेच्या पटांगणावर मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. 19 फेब्रुवारी 2017 या शिवजयंती दिनी 21 संभाजी सैनिकांनी नियोजित पुतळ्यासाठी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तरी देखील पुतळ्याचे काम झाले नाही.

संभाजी सैनिक घालणार घेराव
मुख्यमंत्री यांनी शिवप्रेमी जनतेला दिलेला शब्द पाळावा आणि त्यांच्याहस्ते शिवपुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन करावे. तसेच याबाबतचा कार्यक्रम आराखडा अगोदरच तयार करून जाहीर करावा. आपण तसे न केल्यास संभाजी सैनिक आपणांस घेराव घालून भूमिपूजन करण्यास भाग पाडल्याशिवाय राहणार नाही. प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा निर्माण होणार्‍या कोणत्याही परिस्थितीस पूर्णतः आपण स्वतः आणि आपले शासन आणि प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ, विजय गवळी यांच्यासह कार्यकर्तेव शिवप्रेमी उपस्थित होते.